वृद्ध मातेचा पंख्याला लटकवून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2016 02:14 AM2016-09-30T02:14:37+5:302016-09-30T02:14:37+5:30

अंधेरी येथे राहणाऱ्या एका निर्दयी इसमाने स्वत:च्या जन्मदात्या मातेला साडीने पंख्याला लटकवून तिचा अतोनात छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Persecution by hanging an old lady | वृद्ध मातेचा पंख्याला लटकवून छळ

वृद्ध मातेचा पंख्याला लटकवून छळ

Next

मुंबई : अंधेरी येथे राहणाऱ्या एका निर्दयी इसमाने स्वत:च्या जन्मदात्या मातेला साडीने पंख्याला लटकवून तिचा अतोनात छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचे तोंड कपड्याने तर पाय साडीने बांधले होते. त्यानंतर तिला पंख्याला बांधून गोल फिरवत असल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री या नराधम पुत्रासह तिची सून व नातीला अटक केली. सुरेंद्र वैद्य (वय ४७) असे या नराधमाचे नाव असून, पत्नी बबिता व मुलगी आकांक्षा यांच्या साथीने हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले. मुलाच्या छळवणुकीला बळी पडलेल्या पीडित महिलेचे नाव मायावती वैद्य (७५) असे आहे.
ही घटना तीन महिन्यांपूर्वीची असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले असून एका स्वयंसेवी महिला संस्थेच्या कार्यकर्तीने क्लिप मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईला घाबरविण्यासाठी असे कृत्य केल्याची कबुली सुरेंद्रने पोलिसांना दिली आहे.
अंधेरीतील इंडियन आॅईल जवळच्या एसआरए इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मायावती वैद्य या मुलासह राहतात. हे सर्वजण सफाईचे काम करतात. वृद्धापकाळामुळे मायावती यांना विस्मरण होत असल्यामुळे सुरेंद्र, त्याची पत्नी आणि नातीकडून गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. या छळाची १.४० मिनिटांची एक व्हिडीओ क्लिप नारी सन्मान संघटनेच्या प्रमुख सुंदरी ठाकूर याना दोन आठवड्यांपूर्वी वर्सोव्यातील मनोज सिंग यांच्याकडून मिळाली. या क्लिपमध्ये सुरेंद्र आईचे पाय साडीने बांधून तिला पंख्याला लटकवतो, असे दिसते. जमिनीवर पडल्यानंतरही त्यांना पंख्याप्रमाणे गोलगोल फिरवून जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे. हा सर्व क्रूर प्रकार सुरू असताना खोलीतच उपस्थित असलेली त्याची पत्नी आणि मुलगी चक्क हसत आहेत. या प्रकारामुळे रडणाऱ्या मायावती यांची तिघेजण खिल्ली उडवत असून, आकांक्षा चक्क या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याचे दिसते. पोलिसांनी सुरेंद्र वैद्यसह तिघांना अटक केली. त्यांच्यावर विनयभंग, मारहाण, संगनमताने छळ करणे अशी कलम दाखल करण्यात आली असल्याचे डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

इतना सीरियस नही है!
सुरेंद्रने आई वेडसर चाळे करत असल्याने तिला भीती दाखविण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली. ‘व्हिडिओ मे जितना दिखता है उतना वो सीरियस नहीं है’, असा कांगावाही त्याने केला. मायावती यांच्या नावावर सहा फ्लॅट आहेत. मात्र त्या मोठ्या मुलावर अधिक प्रेम करतात, असा आक्षेप घेऊन त्यांना तिघेजण त्रास देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवाच्या काळात ही क्लिप मिळाली होती. मात्र त्यावेळी पोलीस बंदोबस्तात व्यस्त आल्याने तक्रार केली नाही. मंगळवारी रात्री त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा किळसवाणा प्रकार पाहून पोलिसांनाही अश्रू अनावर झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
- सुंदरी ठाकुर, अध्यक्ष, नारी सन्मान

Web Title: Persecution by hanging an old lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.