जुळ्या मुली झाल्या म्हणून छळ; आईची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 12:02 PM2017-08-04T12:02:32+5:302017-08-04T12:04:40+5:30
पुण्यामध्ये एका 29 वर्षीय महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पुणे, दि. 4- पुण्यामध्ये एका 29 वर्षीय महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चिंचवडमधील राहत्या घरी या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. विट्रो फर्टीलायजेशन उपचाराद्वारे त्या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. पण जुळ्या मुली झाल्या म्हणून पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी गुरूवारी दिली आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
पीडित महिलेचं 2009मध्ये लग्न झालं होतं त्यानंतर पाच वर्षांनंतरही मुलं न झाल्याने तिच्या सासरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरूवात केली होती, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. पीडित महिलेच्या आईने या संदर्भात चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
आत्महत्या केलेल्या महिलेचं आणि तिच्या पतीचं 2009मध्ये लग्न झालं होतं. पण मूलबाळ होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी विट्रो फर्टीलायजेशन उपचाराद्वारे बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. त्यासाठी पीडित महिलेच्या वडिलांनी तिच्या पतीला दोन लाख रुपये दिले. पण या ट्रिटमेंटनंतर पीडितेला जुळ्या मुली झाल्या. त्यामुळे त्यांचा छळ केला जात होता.
पीडित महिला गरोदर असताना सुरूवातीलाच तिचं वजन वाढलं होतं. वजन वाढल्यामुळे तिला घरची कामं करणं शक्य नसल्याचं तिच्या आईने स्पष्ट केलं होतं. पण तरीही महिलेच्या सासरचे तिला काम करण्यासाठी जबरदस्ती करायचे. पण पुढे काम करणं अशक्य झाल्याने तिच्या सासरच्यांनी तिला घराच्या बाहेर काढलं. घरातून बाहेर काढल्यानंतर पीडित महिला तिच्या माहेरी औरंगाबादला गेली होती. पण त्यानंतर तिच्या सासरच्यांनी तिला पुन्हा घरी बोलावून घरकामं करायला भाग पाडलं.
दोन वर्षाआधी या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. पण मुली झाल्याने सासरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरूवात केली होती. सासरच्यांकडून होणाऱ्या मारहाण, शिवीगाळ, मानसिक छळाला कंटाळून त्या राहत्या घरी विष प्यायलं. त्यांनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
.