पर्ससीनचे ४९४ परवाने
By Admin | Published: February 6, 2016 03:43 AM2016-02-06T03:43:31+5:302016-02-06T03:43:31+5:30
पर्ससीन पद्धतीच्या प्रचिलत किंवा कार्यरत मासेमारी परवान्यांची संख्या सध्या ४९४ इतकी आहे. ती टप्प्याटप्प्याने कमी करून २६२ वर आणि अंतिमत: १८२ वर आणण्यात येणार आहे
मुंबई : पर्ससीन पद्धतीच्या प्रचिलत किंवा कार्यरत मासेमारी परवान्यांची संख्या सध्या ४९४ इतकी आहे. ती टप्प्याटप्प्याने कमी करून २६२ वर आणि अंतिमत: १८२ वर आणण्यात येणार आहे. यापुढे पर्ससीन जाळ्याने सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतच मासेमारी करता येईल. तसेच मत्स्यव्यवसायाचे जतन करण्यासाठी सागरी किनाऱ्याची रचना व खंडांतर्गत उतार विचारात घेऊन पर्ससीन मासेमारीचे नियमन झाई ते बांदा दरम्यानच्या चार क्षेत्रांत खालीलप्रमाणे करण्यात येईल.
आसाच्या लांबीवर निर्बंध
यांत्रिक मासेमारी नौकेद्वारे पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या जाळ्यांच्या आसाच्या लांबीवर देखील नियंत्रण आणण्यात आले आहे. तारली माशांसाठी ही लांबी २५ मिलीमीटर व बांगडा माशांसाठी ती ४९ मिलीमीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने जाळ्याची क्षेत्रनिहाय लांबी आणि उंची देखील ठरवण्यात आली आहे. मुरूड ते बुरुंडी क्षेत्रात लांबी १२५-५०० मीटर व उंची १०-४० मीटर, बुरु ंडी ते जयगड क्षेत्रात लांबी २५०-५०० मीटर व उंची २०-४० मीटर तर जयगड ते बांदा क्षेत्रात लांबी ३००-५०० मीटर व उंची १०-४० मीटर ठेवणे अपेक्षित आहे. मासळीच्या साठ्यांचे जतन करण्यासाठी हायड्रोलिक विंचच्या (बुम) साहाय्याने पर्ससीन जाळे ओढण्यावर बंदी घालण्यात आली असून सागरी क्षेत्रात पकडलेल्या मासळीवर रसायनांचा वापर करणे तसेच त्यांना भूल देऊन पकडणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.येथे असेल बंदी
झाई ते मुरूड किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंतचे क्षेत्र पारंपरिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आले असून या क्षेत्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मुरूड ते बुरु ंडी किनाऱ्यापासून १० मीटर (५ वाव) खोलीपर्यंतचे क्षेत्र, बुरुंडी ते जयगड किनाऱ्यापासून २० (१० वाव) मीटरचे क्षेत्र तर जयगड ते बांदा किनाऱ्यापासून २५ मीटर (१२.५ वाव) खालीपर्यंतचे क्षेत्र पारंपरिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापुढील क्षेत्र पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास खुले करण्यात आले आहे.