२०० दिवस कामावर गैरहजर राहणा-या ‘त्या’ हवालदाराला न्यायालयाकडून दिलासा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 02:43 AM2017-09-23T02:43:07+5:302017-09-23T02:43:10+5:30
सलग २०० दिवस कामावर गैरहजर राहणा-या हवालदाराला बडतर्फ करण्याचा पोलीस विभागाचा निर्णय योग्य ठरवत उच्च न्यायालयाने संबंधित हवालदाराला दिलासा देण्यास नकार दिला. याचिकाकर्ता पोलीस विभागात कामाला असूनही तो अनिश्चित काळासाठी कामावर गैरहजर राहिला. त्यामुळे प्रशासकीय लवादाने दिलेला निर्णय योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले.
मुंबई : सलग २०० दिवस कामावर गैरहजर राहणा-या हवालदाराला बडतर्फ करण्याचा पोलीस विभागाचा निर्णय योग्य ठरवत उच्च न्यायालयाने संबंधित हवालदाराला दिलासा देण्यास नकार दिला. याचिकाकर्ता पोलीस विभागात कामाला असूनही तो अनिश्चित काळासाठी कामावर गैरहजर राहिला. त्यामुळे प्रशासकीय लवादाने दिलेला निर्णय योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले.
हवालदार दिलावर मुल्ला १९८६ पासून पोलीस विभागात हवालदार म्हणून काम करत आहेत. ते सलग २०० दिवस कामावर गैरहजर राहिल्याने २०१० मध्ये त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना कामावरून काढण्यात आले. या निर्णयाविरुद्ध दिलावर मुल्ला यांनी प्रशासकीय लवादात (मॅट) धाव घेतली. मात्र लवादानेही मुल्ला यांना कामावरून काढण्याचा पोलीस विभागाचा निर्णय योग्य ठरवला.
मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. आपल्या कृत्याच्या मानाने देण्यात आलेली शिक्षा खूप कडक आहे, असे मुल्ला यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही.के. ताहिलरमाणी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.
मुल्ला १७ सप्टेंबर २००७ पासून २ एप्रिल २००८ पर्यंत कामावर गैरहजर होते. मुल्ला यांची मुले पुण्याला शिकत असून ते कोल्हापूरमध्ये कर्तव्यावर होते. त्यांनी पुण्याला बदली करून मिळावी, यासाठी वरिष्ठांना विनंतीही केली. मात्र त्यांना बदली करून दिली नाही. तसेच मुल्ला यांना नैराश्य आल्याने ते रुग्णालयात होते. दारूचे व्यसन सोडविण्यासाठी त्यांना पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते, असेही मुल्ला यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिले. मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला.