शिल्पकलेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्त्व
By admin | Published: April 20, 2017 03:23 AM2017-04-20T03:23:54+5:302017-04-20T03:23:54+5:30
ज्येष्ठ शिल्पकार जयप्रकाश शिरगांवकर यांनी साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे
- जयप्रकाश शिरगांवकर
ज्येष्ठ शिल्पकार जयप्रकाश शिरगांवकर यांनी साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आणि मदर तेरेसा अशी अनेक शिल्पे देशविदेशात पाहायला मिळतात. टान्झानियाचे राष्ट्रपती ज्युलियस न्येरेरे यांचे शिरगांवकर यांनी साकारलेले शिल्प म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत नजराणा! आज देशभरात त्यांनी मूर्त रूप दिलेले ३५ अश्वारूढ शिवपुतळे शिवसंस्कृतीचे जतन करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी शिल्पकलेची कोणतीही शास्त्रशुद्ध पदवी घेतलेली नाही. वडील ज्येष्ठ शिल्पकार रामचंद्र शिरगांवकर यांच्या तालमीत त्यांच्यातील शिल्पकला बहरत गेली. जगभरात कौतुकास पात्र ठरली. अशा या अवलिया कलाकाराशी मारलेल्या गप्पा ...
तुमचे शिल्पकलेतील गुरू कोण ?
- माझे वडील हे प्रख्यात शिल्पकार होते. त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी केवळ कला जोपासत यावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण गाव सोडले. पुढे जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्समधून १९४९ साली शिल्पकलेची पदवी संपादन केली. परिश्रमाने त्यांनी शिल्पकलेत स्वत:चे स्थान निर्माण केले. कलेचा हाच वारसा मला लाभला. १४-१५ वर्षांचा असल्यापासून मी वडिलांना मूर्ती घडवताना तासन्तास बारकाईने पाहत असे. हळूहळू या कलेकडे मी ओढलो गेलो. आणि हा छंद मला जडला.
तुम्ही पुतळा कसा घडवता?
- ब्राँझ धातू बाजारात सहज उपलब्ध होणारा आहे. कच्चा ब्राँझ आणून आगीच्या भट्टीत वितळवला जातो. वितळवलेला धातू मग विविध साच्यामध्ये ओतला जातो. ब्राँझचा पुतळा बनविण्यापूर्वी पुतळ््याचे क्ले मॉडेल, प्लॅस्टर आॅफ पॅरिस मॉडेल आणि मेणाचे मॉडेल अशा पद्धतीने प्रतिकृती बनवल्या जातात. या सर्व मॉडेल्समध्ये योग्य तो फेरफार झाल्यावर ब्राँझच्या प्रत्यक्ष पुतळ््याचे काम होते. हा पुतळा घडविताना तो भव्य असल्यामुळे विविध प्रकारचे नवीन भाग करावे लागतात. पुतळ््याच्या हातापासून ते पायापर्यंत २२ प्रकारचे भाग असतात. सर्व भाग गॅस वेल्डिंगने पक्के सांधले जातात. ते इतके एकजीव साधावे लागतात की, संपूर्ण पुतळा हा एकच साचा आहे, असे वाटले पाहिजे. गुरुत्वमध्य हा कोणत्याही पुतळ््याचा महत्त्वाचा भाग असतो. रत्नागिरीतील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ््याचा गुरुत्वमध्य हा घोड्याचे मागचे दोन पाय आणि शेपटी यांच्यामध्ये आहे. त्यावरच घोड्याचे पुढचे दोन पाय आणि खुद्द शिवाजी महाराजांचा पुतळा संपूर्ण तोललेला आपल्याला दिसतो.
शिल्पकलेचा व्यवसाय कमी होत चालला आहे ? याच्या मागचे कारण काय?
- पुतळे बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. ब्राँझ धातूच्या वाढत्या किमती, वेल्डिंगसाठी लागणारा कोळसा, गॅस आॅईलचे वाढते दर यामुळे पुतळ््यांच्या किमती लाखोंच्या घरात पोहचलेल्या आहेत. तसेच या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. शिल्पकलेत सहसा कोण काम करायला मागत नाही. कारण या कामात ९० टक्के हमाली असते. महाराष्ट्र शासनाने आता नवीन पुतळे बसवायला बंदी केलेली आहे. जर पुतळा बसवायचा असेल तर रीतसर शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे शिल्पकलेचा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्रात ब्राँझचे पुतळे बनवणारे किती लोक आहेत ?
- शिल्पकलेमध्ये माझी ही तिसरी पिढी कार्यरत आहे. माझे वडील मग मी आणि आता मुलगा जयेंद्रदेखील या व्यवसायात उतरला आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, सोलापूर इत्यादी ठिकाणी पुतळे बनविणारे शिल्पकार आहेत. मुंबईत देखील आहेत, पण धातुचे पुतळे बनविण्यासाठी स्वत:ची भट्टी आणि मोठी जागा लागते. तर मुंबईच्या ठिकाणी मोठी जागा मिळणे कठीण आहे. मुंबईमध्ये दोन स्टुडिओ होते, पण ते कालांतराने बंद पडले. त्यानंतर आता माझा मुंबईतला सर्वात मोठा स्टुडिओ आहे.
आतापर्यंत ब्राँझच्या किती फुटांच्या मूर्ती किंवा पुतळे बनवले आहात ?
- जोतिबा फुले यांचा १२ फुटांचा पुतळा बनवला. रामानंद तीर्थ यांचा मराठवाडा विद्यापीठातला १२ फुटांचा पुतळा तयार केला आहे. महाराष्ट्रात ३० ते ३५ शिवाजी महाराजांचे अश्वारुढ पुतळे बनवले आहेत. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे २००३ साली शिवाजी महाराजांचा अश्वारूढ १२ फुटांचा पुतळा बसविण्यात आला. या पुतळ््याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. तसेच भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत माझा सत्कार करण्यात आला. इंग्लंडमधील हुल सिटी येथील मंडेला गार्डनमध्ये महात्मा गांधी, लंडनच्या केंब्रिज युनिव्हर्सिटीत गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा तर इंडिया हाऊस लंडन या ठिकाणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा मी साकारलेला पुतळा बसवण्यात आला आहे. टान्झानियाचे राष्ट्रपती ज्युलियस न्येरेरे यांचा टान्झानिया पार्लमेंट आणि नवी दिल्ली येथे बसवलेला पुतळादेखील मीच साकारला आहे.
थोर राष्ट्रपुरुषांचा पुतळा बनवताना आपण अभ्यास करता का ?
- एखाद्या थोर राष्ट्रपुरुषाचा पुतळा साकारताना आपण त्यांच्याबद्दल अज्ञानी असून चालत नाही. थोर व्यक्तिमत्वाची बारकाईने मांडणी करावयाची असल्यास सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. काही पुतळे दिसायला सुरेख असतात मात्र, त्यात काही उणिवा दिसून येतात यामागचे कारण अज्ञान किंवा पुरेसा अभ्यास न करणे हेच आहे. त्यामुळे कलाकारांच्या ज्ञानाविषयी जाणते लोक बातचीत करताना आढळतात. यासाठी प्रत्येक कलाकार अभ्यासू असायलाच हवा, असे मला वाटते.
मुलाखत : सागर नेवरेकर