स्वस्त धान्यात कीड,लाकूड, दगडही!
By admin | Published: June 9, 2016 01:32 AM2016-06-09T01:32:52+5:302016-06-09T01:32:52+5:30
शिर्सुफळ सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे स्वस्त धान्य दुकानामध्ये दगड, लाकडे, मातीमिश्रित तसेच कीड लागलेले धान्य मिळते.
पारवडी : शिर्सुफळ सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे स्वस्त धान्य दुकानामध्ये दगड, लाकडे, मातीमिश्रित तसेच कीड लागलेले धान्य मिळते. यामुळे हे धान्य पाळीव जनावरांना खाऊ घालावे लागते. पर्यायाने दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना बाजारातून जास्त दराने धान्य खरेदी करावे लागत आहे.
येथील स्वस्त धान्य दुकानात पाहणी केली असता, ९० टक्के ग्राहकांना मिळणारे धान्य दगडमिश्रित तसेच कचरा असल्याचे समोर आले आहे. याबाबत दुकानदाराला विचारले असता, ‘आम्ही वरून आलेल्या धान्याचे वाटप करतो. याबाबतीत आम्हाला काहीही माहिती नसते’; तसेच दुकानाबाबतीत माहिती विचारली असता ‘महिनाअखेरीस गहू, तांदूळ व रॉकेल मिळते. त्याचे वाटप आम्ही १ तारखेला करतो.’ याबाबत माहिती घेण्यासाठी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
सुप्यात नागरिकांना धान्य मिळेना
सुपे : सुपे परिसरात शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार मिळत नसल्याची तक्रार परिसरतील ग्रामस्थांनी केली आहे. शासनाच्या वतीने अन्नसुरक्षा योजना तसेच अंत्योदय योजना राबवित असताना रेशनिंग दुकानदार कमी धान्य देत असल्याची तक्रार केली आहे. रेशनिंग दुकानदार कुटुंबातील पाच व्यक्तींमागे चार व्यक्तींच्या धान्याचे वाटप करतात. अंत्योदय योजनेतही हाच सावळा गोंधळ होत असल्याची तक्रार रेशनिंग कार्डधारकांनी केली आहे.
>नवकार्डधारक धान्यापासून वंचित
काऱ्हाटी : परिसरात हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. त्यातच नव्याने रेशन कार्ड धारकाला शासन मंजुरी नसल्याने १५० कुटुंबांना लाभ घेता येत नाही. धान्य मिळत नसल्याने या कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली.
दुष्काळात रेशनिंगचा माल मिळत असल्याने अनेक कुटुंबांना रेशनिंग आधार बनला आहे. मात्र, नवकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याने ऐन दुष्काळात महागडे धान्य विकत घ्यावे लागत आहे.
काऱ्हाटीतील ५४३ कुटुंबांना रेशनचे धान्य मिळते. त्यांत ३४२ अन्नसुरक्षा योजनेतील, ५७ बीपीएल, १४४ अंत्योदयमधील कुटुंबांना रेशनचे धान्य दिले जाते.
रेशन दुकानचालक चंद्रकांत लोणकर यांनी या कार्डधारकांना धान्य मिळण्यासाठी वरिष्ठांकडे कागदपत्रे पाठविली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.