पीटर मुखर्जीला दिलासा नाही
By admin | Published: November 17, 2016 06:18 AM2016-11-17T06:18:02+5:302016-11-17T06:18:02+5:30
शीना बोराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
मुंबई: शीना बोराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांनी बुधवारी पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
सीबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पीटरला शीना बोरा हत्येप्रकरणी अटक केली. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, पीटरने उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला. मंगळवारी पीटरतर्फे आबाद पौडा यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. शीना आणि राहुलच्या प्रेमसंबंधाला पीटरचा विरोध नसल्याचे अॅड. पौडा यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. इंद्राणीच्या सांगण्याप्रमाणे पीटर वागला आणि त्याची तिच चूक त्याला भोवल्याचेही अॅड. आबाद पौडा यांनी सांगितले.
बुधवारच्या सुनावणीत सीबीआयने पीटरच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर आक्षेप घेतला. ‘शीना आणि राहुलच्या प्रेमसंबंधाला पीटरचा आक्षेप होता. पैसे नसेल तर शीना तुला सोडून जाईल,’ असे पीटरने राहुलला मेलद्वारे सांगितले होते. पीटरने मित्राच्या सहाय्याने शीना आणि राहुलला वेगळे केले होते,’ असा युक्तिवाद सीबीआयतर्फे अॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी उच्च न्यायालयात केला.
शीनाची हत्या करण्यापूर्वी व हत्या केल्यानंतर इंद्राणी मोबाइलद्वारे सतत पीटरच्या संपर्कात होती, असेही अॅड. सिंग यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत, उच्च न्यायालयाने पीटरचा जामीन अर्ज फेटाळला. शीनाच्या हत्येप्रकरणात इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना, श्यामवर राय आणि पीटर मुखर्जी हे आरोपी आहेत. (प्रतिनिधी)