अमित देशमुखांविरुद्धची याचिका फेटाळली
By Admin | Published: July 19, 2016 04:50 AM2016-07-19T04:50:59+5:302016-07-19T04:50:59+5:30
देशमुख यांच्या निवडणूक खर्चावर आक्षेप घेऊन त्यांची निवड रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी फेटाळली.
औरंगाबाद : काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या निवडणूक खर्चावर आक्षेप घेऊन त्यांची निवड रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी फेटाळली.
२०१४ मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून देशमुख यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीच्या रिंगणात एकूण २३ उमेदवार होते.
देशमुख हे एक लाख १९ हजार ६५६ मतांनी विजयी झाले. मात्र त्यांच्या निवडीला याचिकाकर्ते महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार अण्णाराव पाटील यांनी आक्षेप घेतला. पाटील यांना ४०३ मते मिळाली होती.
निवडणूक आयोगाने उमेदवारांना २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा घातलेली असताना, देशमुख यांनी त्यापेक्षा अधिक खर्च केला. त्याचप्रमाणे २२ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या युवक मेळाव्याचा खर्च निवडणूक खर्चात दाखवला नाही. मर्यादेपेक्षा अधिक निवडणूक खर्च केल्याने त्यांची निवड रद्द करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. (प्रतिनिधी)