फोंडा नगरपालिका निवडणुकी संदर्भात शेवटी याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:19 PM2023-04-06T18:19:13+5:302023-04-06T18:19:20+5:30
प्रभाग फेररचना करताना झालेला अन्याय तसेच, दोन प्रभागांमधील आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज केणी, विन्सेत फर्नांडिस व प्रदीप नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
अजय बुवा
प्रभाग फेररचना करताना झालेला अन्याय तसेच, दोन प्रभागांमधील आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज केणी, विन्सेत फर्नांडिस व प्रदीप नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे .
सविस्तर वृत्तानुसार फोंडा नगरपालिका निवडणूक घेण्याअगोदर प्रभागवार फेररचना करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रभाग आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक 11 हे सलग तिन्ही वेळा वेगवेगळ्या कारणावरून आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसाधारण गटातील उमेदवारावर तिन्ही वेळा अन्याय झाला होता. हि बाब घेऊन माजी नगराध्यक्ष मनोज केणी व माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी याचिका दाखल केली आहे. तर प्रभाग नऊचे माजी नगरसेवक विन्सेत फर्नांडिस यांनी मतदार फेररचनेवर आक्षेप घेतलेला आहे. फेररचना करताना त्यांच्या प्रभागातील मते भौगोलिक संदर्भ नसताना लांबच्या प्रभागांमध्ये टाकण्यात आली आहेत तर प्रभाग तीनची मोठ्या प्रमाणावर मते त्यांच्या प्रभागांमध्ये घुसळण्यात आलेली आहेत. आपला पराभव होण्यासाठीच सदरची रचना करण्यात आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा मुद्दा घेऊन याचिका दाखल केली आहे.
जेष्ठ वकील सुबोध कंटक हे ह्या बाबतीत उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. पुढच्या आठवड्यात सदर याचिका सुनावणीस येण्याची शक्यता असून न्यायालयाचा जो काही निकाल येईल त्यावर फोंडा नगरपालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
कुजबूज खरी ठरली:
प्रभाग फेररचनेच्या मुद्द्यावरून काही आजी-माजी नगरसेवक न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे कुजबूज बुधवारी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली होती ती आज खरी ठरली आहे.