वैद्यनाथ बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्र्रकरणी याचिका
By Admin | Published: February 14, 2017 03:42 AM2017-02-14T03:42:38+5:302017-02-14T03:42:38+5:30
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेतील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात विद्यमान चेअरमन अशोक जैन आणि संचालक
औरंगाबाद : परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेतील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात विद्यमान चेअरमन अशोक जैन आणि संचालक, तसेच इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने एक आठवड्यात परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी व न्यायालयाने या तक्रार अर्जावर लवकरात लवकर आदेश द्यावेत, असा आदेश न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी या याचिकेच्या अनुषंगाने सोमवारी दिला.
ही बँक विद्यमान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असून, त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे बँकेच्या संचालिका आहेत. त्यामुळे अधिकारी कार्यवाही करीत नाहीत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. बँकेचे सभासद सुभाष निर्मळ यांनी अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे.
आश्रुबा गरड यांनी वेगवेगळ्या नावाने स्थापन केलेल्या बोगस कंपन्यांना जैन व संचालकांनी कुठलेही तारण न घेता, वरील कालावधीत २५ कोटी रुपये कर्जाऊ दिले. विशेष म्हणजे, सदर संस्थांच्या मालमत्ता यापूर्वी इतर बँकांकडे तारण ठेवलेल्या असतानाही वैद्यनाथ बँकेने त्यांना कर्ज दिले, तसेच एम. टी. देशमुख यांना २.५ कोटी रुपये, तसेच (स्व) गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन चेअरमन असलेल्या व सध्या त्यांची मुलगी खासदार प्रीतम मुंडे चेअरमन असलेल्या सोलापूर येथील दंत महाविद्यालयाला ३ कोटी रुपये १०० रुपयांच्या बाँडवर कर्ज दिले. त्याचप्रमाणे, जळगाव येथील प्रभंजन आॅटोमोबाइल्स यांना ५ कोटी रुपये कर्ज दिले. अशा प्रकारे इतरांना जैन व संचालकांनी कोट्यवधी रुपये बेकायदेशीररीत्या कर्जरूपाने वाटप केले. त्यातील काही रक्कम जैन यांच्या नावावर हस्तांतरित झाली आहे, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. (प्रतिनिधी)