मंगळागौरीमध्ये पुरूषांच्या प्रवेशासाठी उच्च न्यायालयात याचिका
By admin | Published: August 26, 2016 12:44 PM2016-08-26T12:44:12+5:302016-08-26T12:44:12+5:30
अखिल भारतीय पुरूष मुक्ती संघटनेनं मंगळागौरीचे खेळ पुरूषांनाही खेळता यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Next
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
अखिल भारतीय पुरूष मुक्ती संघटनेनं मंगळागौरीचे खेळ पुरूषांनाही खेळता यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर आणि पाठोपाठ हाजी अली दर्ग्याच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून राज्य घटनेनुसार महिला व पुरूष समान असल्याचे ठासून सांगितले. या निर्णयामुळे उत्साह द्विगुणित झालेल्या अखिल भारतीय पुरूष मुक्ती संघटनेने पूरूषांना मंगळागौरीचे खेळ श्रावणात खेळू द्यावे अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे.
यंदाच्या श्रावणामध्ये एका प्रसिद्ध वाहिनीने मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये भाग घेण्यासाठी विले पार्ले येथील 'फक्त सखा मंगळागौर' मंडळाचे अतृप्त धडपडे यांनी प्रवेश पत्रिका भरली होती, मात्र ही स्पर्धा केवळ महिलांसाठी असल्याचे सांगत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. धडपडे यांनी अखेर अखिल भारतीय पुरूषमुक्ती संघटनेला मदत करण्याची साद घातली. आजच्या हाजी अलीसंदर्भातल्या निकालानंतर आपल्यालाही दिलासा मिळेल अशी खात्रीच पुरूष मुक्तीची आस लागलेल्या समाजसेवकांची झाली आहे.
मंगळागौरीचे खेळ पूरूष खेळतील तर त्याचा फार व्यापक फायदा पुरूषवर्गाला होऊ शकतो असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. यामुळे स्त्री-पुरूष समानतेची बूज राखण्याबरोबरच समाजाला काय काय फायदे होतील याची यादीच याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात सादर केली आहे. वाचकांच्या माहितीसाठी या याचिकेत नमूद करण्यात आलेले काही फायदे पुढे देत आहोत...
- मंगळागौरीमध्ये उखाणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. रामदास आठवलेंसारख्या कवीमनाच्या नेत्याला चांगलं व्यासपीठ मिळेल.
- मंगळागौरीमध्ये गाठोडं घालतात, यामध्ये जमिनीवर बसून अंगठे पकडून लोळायचं, उठायचं असा प्रकार चालतो. अमित शाह, नितिन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांना पोटाचा घेर कमी करण्यासाठी या खेळाचा फायदा घेता येऊ शकेल.
- भारतीय क्रिकेटपटू विकेट घेतल्यावर विंडिज अथवा ऑस्ट्रेलियन खेळाडुंची नक्कल आनंद व्यक्त करण्यासाठी करतात. मंगळागौरीतल्या अत्यंत स्वदेशी अशा फुगड्यांचा फायदा त्यांना जल्लोष व्यक्त करण्यासाठी करता येईल. समोरच्याला गोल गोल फिरवणाऱ्या फुगड्यांचे तब्बल 21 प्रकार आहेत. फुगड्यांचे विविध प्रकार बघूनच समोरच्या टीमचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होईल व लगेच पुढची विकेट पडेल.
- सासू - सुनेचं भांडण हा एक अप्रतिम कलाविष्कार मंगळागौरीत रंगतो. व्यवस्थित तालीम केली तर अधिवेशनाच्या काळात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांना अत्यंत नैसर्गिक वाटेल असा वादावादीचा अभिनय या खेळामुळे साधेल.
- सवतीचं भांडणसारख्या खेळावर हुकूमत मिळवली तर लालकृष्ण आडवाणी, सुब्रमण्यम स्वामी, पी. चिदंबरम, हरभजन सिंग, करूणानिधी, नरसिंग यादव, रघुराम राजन, शाहरूख खान व सलमान खान अशा विविध क्षेत्रातल्या दिग्गजांनाही आपापल्या क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ऊर्जा मिळेल.
याखेरीज फेर, गोफ, सूप, घागर घुमू दे, खुर्ची का मिर्ची, किस बाई किस, कोंबडा, किकिच पान, दिंडा, सुपारी, काचकिरडा, पकवा, पिंगा असे सर्वांगासाठी उपयुक्त तब्बल 110 व्यायामप्रकार मंगळागौरीच्या खेळांमध्ये असून पुरूषमंडळी त्यापासून वंचित राहत असल्याचा खेद या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे.
लोकसंख्येच्या 40 ते 45 टक्के असलेल्या महिलांच्या एकगठ्ठा मतदारसंघाला नाराज करून चालणार नाही, या राजकीय सोयीपोटी कुठलाही पक्ष पुरूषांच्या या मागणीकडे ढुंकून बघत नसल्याची खंत व्यक्त करत आता, माननीय न्यायालयानेच पुरूषांना समान हक्क बहाल करावेत आणि मंगळागौरीचं व्यासपीठ खुलं करावं अशी कळकळीची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून एक सप्टेंबर, बैल पोळ्याच्या दिवशी सुनावणी ठेवण्यात आली आहे.