जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविले
By admin | Published: August 26, 2016 04:42 PM2016-08-26T16:42:16+5:302016-08-26T16:42:16+5:30
कांद्याला ५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकही अधिकारी न भेटल्याच्या
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 26 - कांद्याला ५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकही अधिकारी न भेटल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविण्यात आले. तसेच दालनाजवळ कांदे फेक आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश देसले, राष्ट्रवादी युवती प्रमुख कल्पिता पाटील, लिगल आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड.सचिन पाटील, अॅड.कुणाल पाटील, शितल पाटील, रुपाली मराठे, ललित बागुल,पंकज वाघ यांच्यासह कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्या दालनाजवळ आले. या ठिकाणी स्वीय साहाय्यकांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या कार्यालयात नसल्याने त्यांची भेट होऊ शकत नसल्याचे निवेदनकर्त्यांना सांगितले. त्यानंतर पदाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे आले. मात्र मुंडके देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले नाही. त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाजवळ आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यकांनी उपजिल्हाधिकारी साजीद पठाण हे दालनात असून त्यांच्याकडे निवेदन देण्यास सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांनी पठाण यांना निवेदन स्विकारण्यासाठी या ठिकाणी बोलवावे असा आग्रह धरला.
संतप्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविले तसेच एकही अधिकारी जागेवर नसल्याच्या निषेधार्थ सोबत आणलेली कांद्यांची गोणी दालनाजवळ रिकामी केली.