पेट्रोल, डिझेल स्वस्त, तरीही प्रवास महागडाच

By admin | Published: February 5, 2015 12:36 AM2015-02-05T00:36:19+5:302015-02-05T00:36:19+5:30

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी, त्या प्रमाणात भाडे घट होत नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Petrol, diesel is cheaper, but it is still expensive | पेट्रोल, डिझेल स्वस्त, तरीही प्रवास महागडाच

पेट्रोल, डिझेल स्वस्त, तरीही प्रवास महागडाच

Next

मिलिंद कांबळे ल्ल पिंपरी
गेल्या वर्षभरात पेट्रोल, डिझेल इंधनाचे दर सातत्याने कमी होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी, त्या प्रमाणात भाडे घट होत नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रिक्षा, पीएमपी, एस.टी. बस प्रवास भाडे आणि माल वाहतूक वाहनांचे शुल्क कमी झालेले नाही.
पेट्रोल, डिझेलचे दर वारंवार कमी होत आहेत. मात्र, त्याप्रमाणे प्रवासी भाड्यात घट होत नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रिक्षा, बस, मोटार आदी वाहने असंख्य वाहने सीएनजी इंधनावर चालतात. सीएनजी वापरण्याचे प्रमाण वाहनांमध्ये सर्वांधिक आहे. सीएनजीचे दर पेट्रोल व डिझेलपेक्षाही कमी आहेत. सीएनजीवर वाहन असले, तरी भाडे दर पेट्रोलप्रमाणे आकाराले जाते.
इंधनाच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कपात केली जात असल्याने भारत देशातील इंधन दरातही घट केली जात आहे. पेट्रोलचे दर ८२.५४ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यात वर्षभरात १० वेळा घट होत ते ६४.१२ रुपये झाली आहे. दर कमी होऊनही रिक्षा, पीएमपी, एसटी आणि वाहनांचे भाडे कमी केलेले नाहीत.
इंधन दराच्या वाढीनंतर भाजीपाला, दूध, किराणा माल आणि इतर सेवेत त्वरित वाढ केली जाते. महागाईचा फटका म्हणून नागरिक ती सहन करतात. मात्र, इंधन दरात घट झाली तरी, प्रवास आणि वाहतूक भाड्यात घट करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. माल आणि साहित्याची वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक आणि अवजड वाहनांनी आपल्या भाडे शुल्कात तसूभरही घट केली नाही. इंधन दर घटल्याचा लाभ उठवीत रिक्षा, पीएमपी, एसटी, खासगी प्रवासी वाहतूकदार, तसेच, व्यावसायिक वाहतूकदार नफा वाढवीत आहेत. दुसरीकडे सर्वसामान्यांना नाईलाजास्तव अधिक भाडे भरून प्रवास करण्याची वेळ आली आहे, तर साहित्य आणि मालाची ने-आण करण्यासाठी अधिक रक्कम खर्ची करावी लागत आहे.
प्रवास भाडे पेट्रोल व डिझेलच्या दराच्या प्रमाणात ठरविले जाते. मात्र, अनेक वाहने सीएनजीवर धावतात. अशा वाहनांनाही पेट्रोलचे दर कायम आहेत. ही नागरिकांची थेट फसवणूक आहे. सीएनजीप्रमाणे रिक्षा, पीएमपी बस भाडे दर ठरविले गेले नाहीत.

१वर्षभरात पेट्रोलच्या किमती १० वेळा आणि डिझेलच्या किमती ६ वेळा कमी झाल्या आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एलबीटीचा दर कायम असल्याने दोन्हीकडे पेट्रोल व डिझेलचे दर सारखे आहेत. देहूरोड, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत एलबीटी लागू नसल्याने तेथील दर कमी असूनही, पंपचालक वाढीव दराने पेट्रोल व डिझेलची विक्री करतात. ही लूट आहे.

२रिक्षाची दरवाढ १५ आॅक्टोबर २०१३ ला झाली. पहिल्या दीड किलोमीटरला भाडे ११ वरून १७ रुपये वाढविण्यात आले. पुढे प्रत्येक किलोमीटरला ११.६५ रुपये दर ठरविण्यात आला. तो अद्याप कायम आहे. पुणे शहरात ६५ हजार आणि पिंपरी-चिंचवड शहरात १० हजार रिक्षा आहेत. त्यातील ८० ते ९० टक्के वाहने सीएनजीवरील आहेत.

३एसटी बसच्या दरातही वाढ झाली. तसेच, डिझेल दर वाढ आणि तूट भरून काढण्यासाठी पीएमपीच्या संचालक मंडळाने नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रवास दराच्या किमतीमध्ये वाढीचा प्रस्ताव ठेवला. डिसेंबर
२०१४ मध्ये दरवाढीस पीएमपी प्राधिकरणाने या दरवाढीस मंजुरी दिली. टेम्पो, ट्रक व अवजड वाहनांनी वेळोवेळी भाडे दरात वाढ केली. ती कायम आहे.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी इंधन दराप्रमाणे रिक्षा प्रवासी भाडे दरात बदल केला जात नाही. तर, महागाई निर्देशांकानुसार ही वाढ केली जाते. रिक्षांच्या सुट्या भागाची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची महागाई यानुसार रिक्षाची भाडे वाढ केली जाते. दर वर्षी १ मे रोजी ही वाढ होते. हकीम समितीने महाराष्ट्र शासनाला ही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्याचा शासनाने स्वीकार केला आहे. इंधन दरवाढीस प्रवास दर कमी आणि घटाचा संबंध जोडला जाऊ नये.
- बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे भारतातही या इंधनाच्या दरात कपात झाली आहे. ही कपात गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. बुधवारी (दि.४) पेट्रोल २.४२ रुपये आणि डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त झाले. पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील दर सारखे आहेत. कॅन्टोन्मेंट भागात एलबीटी नसतानाही महापालिकेच्याच दरात इंधनाची विक्री गेली जात आहे.
- अली दारुवाला, अखिल भारतीय पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते

Web Title: Petrol, diesel is cheaper, but it is still expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.