Petrol-Diesel prices:नऊ रुपये स्वस्त पेट्रोलसाठी गाड्या थेट गुजरातच्या पंपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:07 AM2022-04-08T06:07:28+5:302022-04-08T06:08:02+5:30
Petrol-Diesel prices Hike: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या तुलनेत गुजरात आणि सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात इंधनाचे दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे स्थानिक वाहनचालक इंधन भरण्यासाठी सीमेपलीकडील पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत.
बोर्डी : इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंधन भरणे खिशाला न परवडणारे झाले आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या तुलनेत गुजरात आणि सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात इंधनाचे दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे स्थानिक वाहनचालक इंधन भरण्यासाठी सीमेपलीकडील पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. दरम्यान, तेथेही गर्दी वाढून तास-तासभर थांबावे लागत असल्याने आगीतून फोफाट्यात पडल्याची भावना स्थानिक वाहनचालकांची झाली आहे.
मागील जून महिन्यांपासून पेट्रोलचे दर शंभरी पार जाण्यास प्रारंभ झाला. काही महिने हे दर स्थिर राहिल्यानंतर एप्रिल महिन्यात प्रतिलिटर उच्चांकी दरवाढ सुरू आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल भरणे नागरिकांना जिकिरीचे झाले आहे. गुजरात येथे पेट्रोलचे प्रतिलिटर दर १०६.३५ पैसे, तर सीएनजी प्रतिकिलो ७६.९८ आहे. पालघरच्या तुलनेत सुमारे ९ रुपयांनी हे दर कमी आहेत. त्यामुळे वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी सीमेपलीकडे जाण्यास पसंती देत आहेत. नागरिक वाहनात पेट्रोल भरण्यासह कॅन किंवा प्लास्टिक बाटलीत भरून सोबत नेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत पैशांची बचत होत आहे.
रोजगारावर होत आहे परिणाम
असे असले तरी इंधन भरण्यासाठी उंबरगाव, संजाण येथे रांगा लागत असल्याने तासनतास वाया जातो. तर दैनंदिन रोजगारावर परिणाम होत असल्याची खंत रिक्षांसह अन्य वाहनचालकांनी बोलून दाखवली.
पंपांवर गर्दी वाढल्याने अतिरिक्त ताण वाढून वाहनांच्या व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्यावे लागत असल्याचे तेथील पंपचालकांचे म्हणणे आहे.
लसीकरणावेळी महाराष्ट्रापेक्षा गुजरातेत अधिक सेंटर असल्याने पूर्वी येथील नागरिकांच्या रांगा त्या राज्यात दिसल्या होत्या. या आठवणींना उजाळा मिळाला आहे.