Petrol, Diesel Shortage: राज्यात पेट्रोल, डिझेलची टंचाई होणार? कंपन्यांकडून पुरवठा थंडावला; या महत्वाच्या जिल्ह्यात संकटाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:04 AM2022-05-18T10:04:30+5:302022-05-18T10:18:49+5:30
Petrol, Diesel Shortage: पेट्रोलिअम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले आहे. याचाच परिणाम म्हणून पेट्रोल पंपांना मागणीनुसार पुरवठा कमी होऊ लागला आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू गेल्या महिनाभरापासून इंधनाच्या वाढत्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे पेट्रोलिअम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले आहे. याचाच परिणाम म्हणून पेट्रोल पंपांना मागणीनुसार पुरवठा कमी होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण वाढण्याची शक्यता असून राज्यभरात मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. पेट्रोल पंप असोसिएशनने याची माहिती दिली आहे. जेवढी मागणी आहे त्यापेक्षा कमी प्रमाणावर पुरवठा होऊ लागला आहे. पेट्रोल पंपावर तीन दिवसाचा स्टॉक असावा लागतो, परंतू कमी पुरवठा होत असल्याने पेट्रोल पंप ड्राय पडू लागले आहेत. यामुळे काही ठिकाणी वाद होत असल्याचे औरंगाबाद जिल्ह्याचे पेट्रोल असोसिएशन अध्यक्ष अकील अब्बास यांनी सांगितले.
याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पेट्रोल डिझेलचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद पडत आहेत. लोकांमध्ये वाद होऊ नयेत म्हणून जनजागृती करण्याची गरज त्यांनी जिल्हा व्यवस्थापनाकडे व्यक्त केली.
राज्यभरात टंचाई होईल का?
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आणि दररोज वाढविले जाणारे पेट्रोल, डिझेलचे दर वाढत नसल्याने पेट्रोलिअम कंपन्यांची मोठी पंचाईत झाली आहे. लीटरमागे कंपन्यांना १५ ते २५ रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे या कंपन्यांनी उत्पादन थांबविले किंवा कमी केले आहे. याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर होऊ लागला आहे. राज्यभरात सध्या पेट्रोल पंपांना मागणीपेक्षा कमी प्रमाणावर इंधन पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती सुधरली नाही तर येत्या १५-२० दिवसांत पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवू लागणार असल्याचे एका पेट्रोलपंप मालकाने सांगितले.