व्हॅट कपातीचे 'बारावे'! तुमच्याकडे आजतरी पेट्रोल, डिझेलचे दर बदलले का? होणारही नाहीत, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:24 AM2022-06-01T11:24:52+5:302022-06-01T12:35:30+5:30
२४ मे रोजी ठाकरे सरकारने ट्विट करून पेट्रोलिअम कंपन्यांना आणि डीलर्सना विनंती केली होती.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात मोठी कपात करत जनतेला वाढलेल्या इंधन दरांपासून काहीसा दिलासा दिला. राज्य सरकारने देखील दबावाखाली येऊन २२ मे रोजी व्हॅटमध्ये कपात करत असल्याची घोषणा केली. मात्र, आजवर हे दर काही कमी झालेले नाहीत आणि होणारही नाहीत. कारण या घोषणेमागेच गौडबंगाल आहे.
राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्याची घोषणा केल्या केल्या दुसऱ्या दिवशी इंधन दर कमी व्हायला हवे होते. मात्र, सोमवारी, २३ मे रोजी ते झाले नाहीत. व्हॅट असल्याने त्याचा इफेक्ट १ जूनपासून दिसेल असाही कयास लावला गेला. मात्र, आजही आहेत तेच दर राहिले आहेत. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने अबकारी करात कपात केली होती. पेट्रोल ८ रुपये आणि डिझेल ६ रुपयांनी कमी केले होते. त्याचा इफेक्ट होताना पेट्रोल ९.५० रुपये आणि डिझेल ७ रुपयांनी कमी झाले. हा जो फरक आहे तोच राज्य सरकारच्या व्हॅटचा आहे. तेच राज्य सरकारने आपण केल्याचे दाखविले. कपात केलेल्या अबकारी करावर जो राज्याचा व्हॅट लागत होता, तो केंद्राच्या घोषणेवेळीच कमी झाला आहे.
२३ मे रोजी दरात कपात न झाल्याने २४ मे रोजी ठाकरे सरकारने ट्विट केले होते. पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धितकर कपातीनंतर दि. २१ मे २०२२ पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबाद महापालिका हद्दीत पेट्रोलवर प्रतिलिटर ३२ रुपये ९० पैशांऐवजी ३० रुपये ८२ पैसे तर डिझेलवर प्रतिलिटर २२ रुपये ७० पैशांऐवजी २१ रुपये २६ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल. तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी दि. २१ मे २०२२ पासून पेट्रोल वर प्रतिलिटर सरासरी ३२ रु. ८० पैशांऐवजी ३० रु. ८० पैसे इतका तर डिझेल वर प्रतिलिटर २० रु. ८९ पैशांऐवजी १९ रु. ६३ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल. सर्व ऑइल कंपन्या,पेट्रोल पंपधारकांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे कर आकारणी करावी, असे यात म्हटले होते. परंतू आज १ जून उजाडला तरी देखील एक पैशाचाही बदल झालेला नाही. यापुढेही इंधनाच्या दरात व्हॅट कमी केल्याची कपात होणार नाही.
खरेतर ठाकरे सरकारने घोषणा २२ मे रोजी सायंकाळी केली, आणि कर कपात २१ मे पासून लागू करण्यास सांगितले होते. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दोघांनी देखील केंद्राने अबकारी करात कपात केल्यावर राज्यांना व्हॅटमध्ये कपात करण्यास सांगितले होते. महाराष्ट्राने दिवाळीत केली नाही परंतू आताही केली नाही.