हेल्मेट सक्तीविरोधात पेट्रोलपंप चालक एकवटले
By admin | Published: July 27, 2016 06:48 PM2016-07-27T18:48:59+5:302016-07-27T19:22:28+5:30
नो हेल्मेट नो पेट्रोल राज्य शासनाच्या या कायद्याविरोधात राज्य पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन नो परचेस पेट्रोल-डिझेल अशा स्वरूपाचे आंदोलन १
ऑनलान लोकमत
अकलूज, दि. २ : नो हेल्मेट नो पेट्रोल राज्य शासनाच्या या कायद्याविरोधात राज्य पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन नो परचेस पेट्रोल-डिझेल अशा स्वरूपाचे आंदोलन १ आॅगस्ट पासून करणार असून इंधन खरेदी विरोधातील या आंदोलनात राज्यातील ४ हजार ९०० डिलर्स सहभागी होणार तर सोलापूर जिल्ह्यातील २१९ डिलर्सचा सहभाग असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय ताटे-देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पेट्रोल पंप डिलर्स असो.च्या प्रमुख पदाधिकार्यांची तातडीची बैठक आज (बुधवार दि. २६) मुंबईत झाली. बैठकीसाठी असोसिएशनचे राज्याध्यक्ष उदय लोध, राज्य सल्लागार रमेश कुंदनमल, मुंबई विभाग प्रमुख रवी शिंंदे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. नो हेल्मेट नो पेट्रोल हा नवीन कायदा १ आॅगस्टपासून अंमलात येणार आहे. या कायद्याला असोसिएशनाने कडाडून विरोध दर्शवला आहे. पेट्रोल पंप डिलर्स हे केवळ इंधन विक्रीचे काम करतात कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांचे काम नाही.
हा कायदा पेट्रोल पंपांवर अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला तर डिलर्सना रोज नव्या वादाला सामोरे जावे लागेल. पेट्रोल पंपांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागेल. डिलर्स व पेट्रोल पंपांवरील कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत असोसिएशनने १ आॅगस्टपासून इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंपांवरील उपलब्ध असलेले इंधन संपले की हे सर्व पंप आपोआपच बंद राहतील. राज्य शासनाने हा कायदा त्वरीत मागे घ्यावा अन्यथा हे आंदोलन बेमुदत राहील अशा निर्णय घेण्यात आल्याचे संजय ताटे-देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव महेंद्र लोखंडे, करमाळा तालुकाध्यक्ष पंकज क्षीरसागर उपस्थित होते.
- महाराष्ट्र राज्य पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे सोलापूर जिल्ह्यात २१९ डिलर्स सदस्य आहेत. हे सर्व डिलर्स १ आॅगस्टपासून या आंदोलनात सहभाग होणार आहेत. कोणत्याही कायद्याची अंमलबाजवणी इंधन विक्रेत्यांवर लादणे पुर्णपणे चुकीचे आहे. हा कायदा मागे घेण्याबाबत राज्य शासनाला आम्ही ३१ जुलै पर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा १ जुलै पासुन अंदोलन सुरु होणार आहे. -- संजय ताटे-देशमुख
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन, सोलापूर