पेट्रोलपंप घोटाळ्यात मालकांचे अटकसत्र, तीन मालकांसह पाच जण जेरबंद ,आमदाराच्या भावाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 04:48 AM2017-09-14T04:48:08+5:302017-09-14T04:48:41+5:30
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोलपंपाचे मालक जयदास तरे आणि तंत्रज्ञ विनोद अहिरे या दोघांना अटक केली. त्यानंतर,कल्याण-शीळफाटा, काटईनाका येथील साई पेट्रोलपंपाचे मालक संजयकुमार यादव आणि बुधवारी हाजी मलंगगड येथील सद्गुरू पेट्रोपपंपाचे मालक बाळाराम गायकवाड व तंत्रज्ञ डबरूधर मोहंतो अशा तिघांना अटक केली. अहिरे आणि तरे यांना गुरुवारपर्यंत तर उर्वरित तिघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. अहिरे याने डोंबिवलीतील तर मोहंतो याने नागपुरातील पेट्रोलपंपांवरील यंत्रांमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे.
पेट्रोलपंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाºया डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सरनामक यंत्र असते. त्यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी इंधन देणाºया पेट्रोलपंपांवर ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आदेशानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने डोंबिवलीत १७ जून २०१७ रोजी पहिली कारवाई केली. त्यानंतर, राज्यभरात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे सत्र सुरू केले.
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी जशी छापासत्राची कारवाई करण्यासाठी पथके तयार केली होती, तशीच अटकसत्रासाठी पथके तयार केली आहेत. सध्या ४-५ पथके नेमल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२४ जणांना अटक : राज्यात टाकलेल्या १७५ ठिकाणच्या छाप्यात ९४ ठिकाणी मापात पाप असल्याची बाब पुढे आली होती. तसेच याप्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक केली असून ते सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील २३ जणांविरोधात मुख्य आणि पुरवणी असे दोन दोषारोपपत्र काही दिवसांच्या अंतरावर न्यायालयात सादर केले आहे.