फडणीस, सरवटे यांना ‘जीवनगौरव’
By admin | Published: April 17, 2016 02:14 AM2016-04-17T02:14:23+5:302016-04-17T02:14:23+5:30
अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे
मुंबई : अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे यांना व्यंगचित्रकलेतील अमूल्य योगदानाबाबत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या कन्या मंजिरी आणि अंजली यांनी स्वीकारला, तर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी आपल्या पत्नीच्या साथीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, मानपत्र, ५० हजार
रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शनिवारी सावरकर स्मारकात पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यंगचित्रकला हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. चार ते पाच अग्रलेखांत जे काम होत नाही, ते केवळ एका चित्रातून साध्य करता येते. हे संमेलन केवळ व्यंगचित्रकारांचे नाही, तर साहित्यिकांचेसुद्धा आहे. व्यंगचित्रकारसुद्धा विशेष शैलीतून रेषांच्या माध्यमातून साहित्यनिर्मिती करत असतात, अशा शब्दांत महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यंगचित्रकलेची प्रशंसा केली. या वेळी मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष चारुहास पंडित उपस्थित होते.
पुरंदरे पुढे म्हणाले की, ‘व्यंगचित्रकलेला प्रतिभेची नितांत आवश्यकता असते. या कलेसाठी परमेश्वरांचे देणं असणे महत्त्वाचे आहे. बुद्धी आणि कल्पकतेचा संगम जिथे होतो, तिथे व्यंगचित्रकलेचा जन्म होतो. या कलेत खूप मोठे सामर्थ्य आहे.’ या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे आणि शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रकलेच्या क्षेत्राचा आढावा घेणारी दृकश्राव्य फित दाखविण्यात आली. या वेळी सरवटे यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांचे आभार मानत आपले बालमित्र फडणीस यांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
आनंद अपुराच -शि.द.फडणीस
‘७० वर्षे मी व्यंगचित्रकलेच्या
क्षेत्रात आहे. ही व्यंगचित्र कशी वाटतात, याची पोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली. पुरस्कार मिळूनही आनंद अपुराच आहे. बालमित्र वसंत सरवटे याला पुरस्कार मिळाला. मात्र, तो मंचावर आज उपस्थित राहू शकला नाही, याची खंत वाटते आहे. आम्हाला लेखक व्हायचे होते. यासाठी एका वृत्तपत्रात दोघांनी कथा पाठविल्या होत्या. त्या कथा पाठवून ७५ वर्षे उलटली. मात्र, तरीही त्यावर उत्तर आले नाही. यामागे सुप्त संदेश होता, हे आमच्या लक्षात आले. आम्हाला व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज नाही, हे कळून चुकले. तेव्हापासून मी, कॅनव्हास आणि माझा मित्र एकमेकांची साथ देतो आहोत. चित्रे लहान असली तरी चालेल, पण मनाचा कॅनव्हास मोठा ठेवा,’ असा सल्ला फडणीस यांनी दला.
अमोल ठाकूरने मारली बाजी!
या संमेलनात घेण्यात आलेल्या व्यंगचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी पार पडला. या स्पर्धेसाठी मोबाइलचे वेड, सेल्फी, स्मार्ट सिटी आणि असहिष्णुता असे विषय देण्यात आले होते. या पारितोषिक वितरण समारंभात प्रथम पारितोषिक विजेत्या अमोलने राज ठाकरे यांचे व्यंगचित्र रेखाटले. हे व्यंगचित्र समारंभात राज यांना दाखवून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. या प्रसंगी राज यांनीही त्याने चितारलेल्या व्यंगचित्राला दाद दिली. १० उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
प्रथम क्रमांक : अमोल ठाकूर, (२५ हजार, सन्मानचिन्ह)
द्वितीय क्रमांक : रवीश धनावडे (१५ हजार, सन्मानचिन्ह)
तृतीय क्रमांक : रवींद्र राणे (१० हजार, सन्मानचिन्ह)