फणसाळकर एटीएस प्रमुख
By Admin | Published: April 14, 2015 02:48 AM2015-04-14T02:48:16+5:302015-04-14T02:48:16+5:30
राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची साइड पोस्टिंगला बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांना आणण्यात आले आहे.
३७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्या : कार्यकारी पदांवरील अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंग
मुंबई : राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची साइड पोस्टिंगला बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांना आणण्यात आले आहे. नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन नागपूरचे आयुक्त के. के. पाठक यांची बदली करण्यात आली खरी; परंतु त्यांना पुणे शहराच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. एस.पी. यादव हे आता नागपूरचे आयुक्त असतील. ३७ महत्त्वाच्या पदांवरील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्यांचा आदेश सोमवारी सरकारने काढला. सर्वात धक्कादायक बदली फणसाळकर यांची ठरली. ते मुंबईचे सहआयुक्त (प्रशासन) होते. एटीएसच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळणाऱ्या हिमांशू रॉय यांची थेट पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर बदली करण्यात आली.
युती सरकारने पोलीस दलात केलेला हा पहिला मोठा फेरबदल आहे. २६/११ हल्ल्यानंतर प्रस्तावित असलेले व सध्या रिक्त असलेले सहावे महासंचालक पद भरणे, मुंबईच्या आर्थिक गुन्हे विभागासाठी स्वतंत्र सह आयुक्तपदाची निर्मिती करणे व सातत्याने कार्यकारी पदांना चिकटलेल्या अधिकाऱ्यांना अकार्यकारी किंवा साइड पोस्टिंग देणे हाच या बदल्या-बढत्यांमागे मुख्य हेतू असल्याचे दिसून येते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील आणि नागपूरशी संबंधित अधिकाऱ्यांना त्या जागी आणले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. या चर्चेची सुरुवात नागपूरचे तत्कालीन आयुक्त के. के. पाठक यांच्यापासून सुरू झाली होती. त्यांना नागपूरहून उचलून मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात येईल. त्यासाठी सध्याचे मुंबई आयुक्त राकेश मारिया यांची अन्यत्र बदली केली जाईल, असे बोलले जात होते. मात्र सरकारने पाठक यांना मुंबईत आणले नसले तरी त्याखालोखाल महत्त्वाचे मानले जाणारे (पुणे आयुक्त) पद बहाल केले. तर नागपूर आयुक्तपदाची जबाबदारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर महासंचालक एस.पी. यादव यांच्याकडे सोपविण्यात आली. औरंगाबादचे आयुक्त राजेंद्र सिंह यांची बदली नियोजन आणि समन्वय, महासंचालकपदी केली असली तरी त्यांच्या जागी कोणाचीही नेमणूक केलेली नाही.
नागपूर कनेक्शन
रा.स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरशी संबंध असलेल्या वा आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला महत्त्वपूर्ण पदे आली.
1. नागपूरचे आयुक्त के. के. पाठक यांना पुण्यासारख्या शहराचे आयुक्तपद
2. फणसाळकर यांना एटीएस प्रमुखपद
3. अनुप कुमार सिंह मुंबईचे सह आयुक्त
माथूर सहावे महासंचालक
पुण्याचे आयुक्त सतीश माथूर यांना बढती देत विधी व तांत्रिक विभागाचे महासंचालक करण्यात आले. २६/११ हल्ल्यानंतर राज्यात सहावे या दर्जाचे पद निर्माण करण्यात आले होते आणि जयंत उमराणीकर यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कालांतराने या पदाचा दर्जा महासंचालकऐवजी अतिरिक्त महासंचालक असा कमी करण्यात आला. नव्या आदेशांनुसार माथूर यांना महासंचालकपदी बढती मिळाल्याने ते पद पुन्हा प्रस्थापित झाले. त्यामुळे आता सहा महासंचालक आहेत.
आर्थिक गुन्हे अन्वेषणसाठी स्वतंत्र सहआयुक्त
सरकारने मुंबई गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत असलेल्या आर्थिक गुन्हे विभागासाठी स्वतंत्र सहआयुक्त पद निर्माण केले. आर्थिक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणे शक्य व्हावे हा सरकारचा हेतू असावा. या नव्या पदाची जबाबदारी तत्कालीन सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था, मुंबई) धनंजय कमलाकर यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात प्रशासन, कायदा-सुव्यवस्था, गुन्हे, वाहतूक विभागांच्या जोडीला पाचवे सहआयुक्तपद तयार झाले.