पिंपरीतील एसटी आगारात बॉम्बचा स्फोट!
By admin | Published: November 4, 2015 02:39 AM2015-11-04T02:39:00+5:302015-11-04T02:39:00+5:30
वल्लभनगर एसटी आगारात मंगळवारी दुपारी एका बसखाली स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरला. जनावरे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘लसणी’ बॉम्बचा हा स्फोट असल्याचा
पिंपरी : वल्लभनगर एसटी आगारात मंगळवारी दुपारी एका बसखाली स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरला. जनावरे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘लसणी’ बॉम्बचा हा स्फोट असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पुणे-मुंबई महामार्गालगत वल्लभनगर (पिंपरी) येथील एसटी आगारात बसगाड्यांची संख्याही मोठी आहे. दिवाळीच्या सुटीतील आरक्षणासाठी आलेल्या प्रवाशांमुळे स्थानकावर नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. दुपारी ४च्या सुमारास दापोली-पिंपरी चिंचवड या बसखाली हा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने भीतीने नागरिकांची पळापळ झाली.
स्फोट झाला त्या ठिकाणी थोडा धूर पसरला. बसखाली रक्त सांडलेले दिसले. त्या ठिकाणी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील कुत्रे दिसून आले. बाजूला काही अंतरावर एक पिशवीसुद्धा आढळली. त्यावरून ही पिशवी कुत्र्याने तोंडात धरून आणली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. थोड्याच वेळात बॉम्बनाशक पथकही दाखल झाले. जनावरे मारण्यासाठी लसणी बॉम्बचा वापर केला जातो तोच बॉम्ब असावा, असे पोलिसांनी सांगितले.
आणखी आठ बॉम्ब
घटनास्थळावर दोन पिशव्या आढळल्या. त्यात आठ बॉम्ब आढळून आले. त्यातील सहा बॉम्ब बॉम्बनाशक पथकाकडे नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले, तर उर्वरित दोन तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत.