महावितरणच्या ‘अॅप’ने ओलांडला लाखाचा टप्पा
By admin | Published: March 6, 2016 01:13 AM2016-03-06T01:13:05+5:302016-03-06T01:13:05+5:30
वीजपुरवठ्याशी संबंधित विविध सेवा देण्यासाठी व तक्रारींचे आॅनलाइन निराकरण करण्यासाठी महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अॅपला प्रतिसाद मिळाला आहे.
बारामती : वीजपुरवठ्याशी संबंधित विविध सेवा देण्यासाठी व तक्रारींचे आॅनलाइन निराकरण करण्यासाठी महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अॅपला प्रतिसाद मिळाला आहे. नुकताच या अॅपने एक लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. या अॅपमुळे कोणत्याही वेळी वीजदेयकांचे अवलोकन, देयकभरणा, तक्रार नोंदणी आणि नंतर तक्रारीची सद्य:स्थिती आदींची माहिती घेता येते. विशेष म्हणजे, नव्या व्हर्जनमध्ये मराठी भाषेचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना या अॅपमुळे मोबाईलवरून आॅनलाइन वीजदेयक पाहता येईल. देयकभरणा, तक्रार नोंदणी, तक्रारीची सद्य:स्थिती पाहण्याबरोबर आॅनलाइन देयकही भरता येईल. त्यांच्या पावत्याही लगेच मिळू शकतील. महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर हे अॅप उपलब्ध आहे. त्यावर ग्राहक क्रमांक दिल्यावर इंग्रजी अथवा मराठी हव्या त्या भाषेत माहिती उपलब्ध करून घेता येईल. या अॅपवरूनच ग्राहकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध तक्रारींसाठी कॉल सेंटरला फोन करता येईल. वीजसेवेशी संबंधित स्थानिक पातळीवर तक्रार स्वीकारणारी तक्रार निवारण केंद्रे गतवर्षीच बंद करण्यात आली होती. तक्रार नोंदविताना ग्राहकास आपला ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही वेळी तक्रार नोंदविता येते. या ठिकाणी आलेल्या तक्रारी केंद्रामार्फत संबंधित कार्यालयास वर्ग करून सोडविल्या जातात. मोबाइल अॅपवरून थेट तक्रार नोंदवता येते. महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे
१८००-२३३-३४३५ किंवा १८००-२००-३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले गेले. या क्रमांकावर राज्यातील ग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या मोबाईल अथवा दूरध्वनीवरून तक्रार नोंदविता येते. महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या या अॅपचे उद्घाटन २७ आॅगस्ट २०१५ रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत अवघ्या सहा महिन्यांतच या अॅपने एक लाखहून अधिक डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या अॅपचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे