घटनातज्ज्ञ अंध्यारुजिना यांचे निधन
By admin | Published: March 29, 2017 03:40 AM2017-03-29T03:40:22+5:302017-03-29T03:40:22+5:30
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी.आर.) अंध्यारुजिना यांचे
मुंबई: सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी.आर.) अंध्यारुजिना यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. दुपारी डुंगरवाडी पारशी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा कुटुंबासह कायदा आणि न्यायालयीन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात सन १९९६ ते १९९८ पर्यंत अंध्यारुजिना भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्याआधी सन १९९३ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल होते. त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून सर चार्लस सार्जंट शिष्यवृत्ती व विष्णू धुरंधर सुवर्णपदकासह कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर अ.भा. सेवा परीक्षा दिली व त्यात तिसरे आल्याने त्यांची भारतीय विदेश सेवेसाठी निवड झाली. परंतु, त्यांनी वकिलीच करण्याचे ठरविले.
सुरुवातीची १६ वर्षे ख्यातनाम वकील एच. एम. सिरवई यांच्यासोबत काम केल्यानंतर स्वतंत्रपणे वकिली सुरु केली. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून अधिनामित करण्यात आले. सुमारे ६० वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी खास करून सर्वोच्च न्यायालयात किचकट घटनात्म मुद्दे असलेली असंख्य प्रकरणे हाताळली. मृत्यूदंडाची शिक्षा कायद्यातून कायमची रद्द करण्याचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. याकूब मेनन याच्या फाशीच्या अपिलाच्या वेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र युक्तिवाद केला होता. (विशेष प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठ, भारतातील अनेक राष्ट्रीय विधी विद्यापीठ, पुण्याचे सिम्बॉयसिस लॉ कॉलेज आणि इंग्लंडमधील बेलफास्ट विद्यापीठातही त्यांनी कायद्याचे अध्यापन केले. त्यांनी अनेक महत्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार आताचा ‘सरफासी’ कायदा केला गेला.