मराठामोर्चात शिस्तीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:51 AM2017-08-10T04:51:10+5:302017-08-10T04:51:27+5:30
गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला मराठा क्रांती मोर्चा अखेर बुधवारी मुंबई काबीज करून गेला. मंगळवारपासून मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे बुधवारी सकाळी ११ वाजता राणीबाग मैदानापासून मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले.
चेतन ननावरे
मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला मराठा क्रांती मोर्चा अखेर बुधवारी मुंबई काबीज करून गेला. मंगळवारपासून मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे बुधवारी सकाळी ११ वाजता राणीबाग मैदानापासून मोर्चाला सुरुवात केली. दुपारी १ वाजून ०५ मिनिटांनी मराठा जनसागराची ही लाट आझाद मैदानावर धडकली. त्यावेळी मोर्चाचे शेवटचे टोक राणीबागेजवळच होते.
या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले. मोर्चाला सुरुवात होण्याआधी वाहतूक पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दक्षिण मुंबईकडून उत्तरेकडे जाणारी एक मार्गिका सुरू ठेवली होती. राणीबाग उड्डाणपुलाखालून जाणाºया रुग्णवाहिकेला पोलीस आणि मराठा स्वयंसेवकांनी काही सेकंदात मार्ग करून दिला. त्यामुळे अवघ्या काही क्षणांत जेजे रुग्णालयाकडे ती रवाना झाली. त्यानंतर एकदा सेंट जॉर्ज रुग्णालयाकडे जाणाºया रुग्णवाहिकेला आणि पुन्हा ‘बाइक अॅम्ब्युलन्स’ला मोर्चेकºयांनी वाट देत शिस्तीचा प्रत्यय दिला. पुढे महिला, त्यामागे पुरुष अशी रचना असलेला मोर्चा निघाला खरा. मात्र त्याआधीच मोर्चापुढे लाखो आंदोलक जमा झाले होते. त्यामुळे सव्वालाख आंदोलकांमागे महिला आंदोलक आणि त्यामागे पुन्हा पुरुष आंदोलक अशी मोर्चाची रचना झाली. परिणामी, जेजे उड्डाणपुलापर्यंत महिला आंदोलक पोहचेपर्यंत सुमारे लाखाहून अधिक आंदोलकांनी उड्डाणपूल व्यापून टाकला होता.
लक्षवेधी वेशभूषा
उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील संदीप लहाणे या शेतकºयाने कर्जमाफीची मागणी करत प्रतिकात्मक फाशीचा देखावा सादर करत मोर्चात सहभाग नोंदवला. शिवरायांसह मराठमोळ्या लावण्यवती आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सामील झालेल्या मराठा आंदोलकांनी विशेष लक्ष वेधले. घोड्यावर स्वार झालेले दोन आंदोलक ऐटबाज दिसत होते. औरंगाबादहून हाती पेटती मशाल घेऊन अर्धनग्न अवस्थेत मोर्चात सामील आईसाहेब युवा संघटनेचे कार्यकर्तेही लक्ष वेधून घेत होते.
असाही पाहुणचार!
भायखळ्यातील जय महाराष्ट्र गोविंदा पथकातील गोविंदांनी रात्रभर राणीबाग मैदानाजवळ जमणाºया वाहनांना कॉटनग्रीन येथे पार्किंगसाठी मार्गदर्शन केले. तर डी. पी. वाडीची माऊली नवरात्रौत्सव मंडळाने आंंदोलकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. कापरेश्वर कृपा गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी आंदोलकांना चहापाणी दिले.
पोलिसांचा १५ तासांचा कडेकोट बंदोबस्त
लाखोंचा सकल मराठा मोर्चा सुरळीतपणे पार पडण्यासाठी सुमारे ३५ हजार पोलीस सलग १५ तास झटत होते. पहाटे साडेपाच वाजल्यापासून तैनात असलेला बंदोबस्त रात्री आठच्या सुमारास शिथिल करण्यात आला. मात्र बंदोबस्ताच्या ताणापेक्षा मोर्चा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणे पार पडल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर होते.
आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बंदोबस्ताचे नेटके नियोजन करीत त्याची काटोकोर अंमलबजावणी करत हे आव्हान पार पाडले. मुंबई पोलीस दलातील २५ हजार पोलीस व केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या असा जवळपास ३५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बुधवारी होता.
केवळ दक्षिण मुंबईत आझाद मैदान, सीएसटीएम, फोर्ट परिसरात तब्बल दहा हजार पोलीस तैनात होते. बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह भायखळापासून ते आझाद मैदानपर्यंतचा परिसर श्वान पथकाच्या मदतीने पिंजून काढला. तसेच वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
गृहराज्यमंत्र्याची ‘कंट्रोल रूम’ला भेट
आंदोलकांच्या विराट गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्यात आला. सहआयुक्त देवेन भारती नियंत्रण कक्षातून नियोजन करीत होते. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दुपारी नियंत्रण कक्षाला भेट दिली.