पुणेकरांना ‘फायरब्रॅँड’ नेत्याचे दर्शन
By admin | Published: April 25, 2016 02:42 AM2016-04-25T02:42:21+5:302016-04-25T02:42:21+5:30
तो बोलायला उभा राहिला आणि एका फायरब्रॅँड नेत्याचे दर्शन पुणेकरांना झाले. देश घडविण्याच्या विचारांत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैचारिक टीका असूनही टाळ्यांच्या कडकडाटाने
पुणे : तो बोलायला उभा राहिला आणि एका फायरब्रॅँड नेत्याचे दर्शन पुणेकरांना झाले. देश घडविण्याच्या विचारांत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैचारिक टीका असूनही टाळ्यांच्या कडकडाटाने आणि आझादीच्या घोषाने तरुणाई भारावून गेली.
जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्या रविवारच्या भाषणाची उत्सुकता गेल्या आठ दिवसांपासून होती. वेळ आणि ठिकाणांत झालेले बदल असूनही आज बालगंधर्व रंगमंदिर प्रेक्षकांनी भरून गेले होते. प्रवेश मिळाला नसल्याने संपूर्ण आवार गर्दीने भरून गेले होते. रस्त्यावर गर्दी होती. सभागृहात कधी टाळ्यांचा कडकडाट तर कधी कन्हैयाकुमारच्या संवेदनांनी पिनड्रॉप सायलेन्स, कधी त्याच्या भाषणाने डोळ्यात पाणी तर कधी त्याच्या आवेशाने वळल्या गेलेल्या मुठी हे चित्र पुणेकरांनी अनेक वर्षांनंतर अनुभवले.
सुमारे पाऊण तास कन्हैयाकुमारच्या वाकगंगेचा प्रवाह सुरू होता. सकाळी झालेल्या हल्याची पार्श्वभूमी सांगून ‘पुणे की धरती गोडसे की है तो दाभोलकरकी भी है. जान देने के लिए यह धरती जानी जाती है’ असे म्हणून त्याने पुणेकरांची मने जिंकून घेतली. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात देशातील असमानता, विद्यार्थ्यांचे प्रश्न येथपासून ते सरकारची धोरणे आणि बेरोजगारांचा प्रश्न येथपर्यंत विवेचन केले. फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारांचा जागर करत असताना खास शैलीत पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. मोदी यांच्यावरील प्रत्येक टीकेला टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता. मात्र, संयमित भाषणाचा प्रत्यय देत आपला मुद्दा मांडताना संदर्भ आला तरच मोदींचा उल्लेख करण्याचे पथ्यही त्याने पाळले. रोहित वेमुला, मराठवाड्यातील दुष्काळ, गोरगरीबांची दु:खे सांगताना तो भावनाविवश होत होता. प्रेक्षकही हेलावून जात होते. या देशात संवेदना, मानवता संपलीय का? असे त्याने विचारले त्यावेळी प्रेक्षकही अंतर्मुख झाले. ‘अंगुठा सिर्फ बटन दबाने के लिए नहीं, मुठ्ठी तनने के लिए भी होता है’ असे तो म्हणाला आणि सर्वांच्याच मुठी आपोआप वळल्या गेल्या. ‘हमें चाहिए आझादी...ब्राम्हणवाद से आझादी....पूंजीवाद से आझादी’, संघवाद की छातीपर....शाहू- फुले- आंबेडकर’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. प्रेक्षकही या घोषणांमध्ये सामील झाले.