‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन, हिंगोलीच्या डीवायएसपी अनिकेतच्या मुलीचे पालकत्व स्वीकारणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 08:40 PM2017-12-11T20:40:07+5:302017-12-11T21:09:11+5:30
पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व स्वीकारण्यास हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील पुढे आल्या आहेत.
सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व स्वीकारण्यास हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील पुढे आल्या आहेत. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. एकीकडे ‘खाकी’ वर्दीतील सैतानांनी अनिकेतचा खून केला; पण याच खार्की वर्दीतील सुजाता पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सुजाता पाटील यांनी लेखी पत्र देऊन पालकत्व स्वीकारण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती केली आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळेला लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजण अटकेत आहेत. अनिकेतला प्रांजल ही तीन वर्षाची मुलगी आहे. पित्याचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी हे घटनेचा आढावा घेण्यास सांगलीत आले होते. त्यांनी कोथळे कुटुंबाच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी प्रांजलने तिची आई संध्याकडे ‘मम्मी हे कोण आहेत’, असा सवाल केला. त्यावर संध्या यांनी हे पोलिस आहेत, असे सांगताच ‘मम्मी’ हे आपल्या पप्पाला मारुन आले आहेत’, असा भाबडा सवाल केल्याने साºयांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
राज्य शासनाने कोथळे कुटुंबास दहा लाखांची मदत केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काही राजकीय नेते व सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत केली. सांगलीतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संस्थेने प्रांजलच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आरोपींना अटक झाली. त्यांना शिक्षा होईल; पण अनिकेतचे कुटुंब व मुलीचे काय? त्यांनी जगायचं कसं? खाकी वर्दीतील युवराज कामटेच्या पथकाने केलेले कृत्य देशात कुठेही घडले नाही. त्याच्या या कृत्याने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पोलिस दल प्रतिमा सुधारण्याचा खटाटोप करीत आहे. असे असताना हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्यास पुढाकार घेतला आहे. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्या करणार आहेत. त्या कोथळे कुटुंबास भेटण्यासही सांगलीत येणार आहेत.
खार्की वर्दीतील माणुसकी
आसंगी तुर्क (ता. जत) येथे मार्च २००२ मध्ये शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहाजणांना जिवंत जाळण्यात आले होते. या कुटुंबातील जगन्नाथ चव्हाण (वय १६) हा एकमेव मुलगा यामध्ये बचावला होता. संपूर्ण कुटुंब आगीत होरपळून मृत्यू पावल्याचे त्याने जवळून पाहिले होते. तो पोरका झाला होता. सांगलीचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. दिगंबर प्रधान यांनी जगन्नाथचे पालकत्व स्वीकारले होते. त्याच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च डॉ. प्रधान यांनी उचलला होता. अनिकेत कोथळेची ही घटना वेगळी आहे. खाकी वर्दीतील सैतानांनी त्याचा खून केला. पण याच खाकी वर्दीतील सुजाता पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडवित प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.