छायाचित्र प्रदर्शनातून खाडी सफारी
By admin | Published: April 26, 2016 04:10 AM2016-04-26T04:10:44+5:302016-04-26T04:10:44+5:30
ठाण्याला वरदान म्हणून लाभलेल्या खाडीतील जैवविविधता येथील कलारसिकांनी अनुभवली, ती छायाचित्र प्रदर्शनातून.
ठाणे : ठाण्याला वरदान म्हणून लाभलेल्या खाडीतील जैवविविधता येथील कलारसिकांनी अनुभवली, ती छायाचित्र प्रदर्शनातून. वीकेण्डला या प्रदर्शनातून खाडी सफारी करत असल्याचा प्रत्यय आला. तीन दिवसांत तब्बल ४०० हून अधिक ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्यक्षात खाडी सफारीची इच्छा व्यक्त केली.
ठाण्याच्या खाडीविषयी जनजागृती व्हावी व जैवविविधता नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने स्वच्छ खाडी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून मंडळाने स्वराज कट्ट्याच्या सहकार्याने या वीकेण्डला ठाणे पूर्व येथील खुल्या कलादालनात ठाणे खाडीतील जैवविविधता विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवले होते. पर्यावरण अभ्यासक प्रकाश जोशी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. खाडीतील प्राणी, पक्षी, कीटक, फुलपाखरे, खारफुटी आदी १५० छायाचित्रे प्रदर्शनात मांडली होती. हौशी छायाचित्रकारांनी खाडीत जाऊन छायाचित्रे काढली आहेत.
खाडीतील पक्ष्यांची छायाचित्रे कलारसिकांच्या सर्वाधिक पसंतीस पडली. सुटी पडल्याने प्रदर्शनाला येणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. ठाणे खाडीतील जैवविविधता विविध मार्गाने पोहोचवणे, हा आमचा मानस आहे. प्रदर्शन पाहिल्यावर अनेकांनी प्रत्यक्षात खाडी सफारीची इच्छा व्यक्त केली. तसेच, सर्वांनीच खाडीत असलेली जैवविविधता पाहून आश्चर्य व्यक्त केल्याचे मंडळाच्या सचिव संगीता जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याआधी कापूरबावडी येथील कलाभवनात हे प्रदर्शन झाले होते. त्या वेळी ५०० हून अधिक ठाणेकरांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी)