उदयनराजेंनी केलेल्या टीकेमुळे शिवसेना भवनचा 'तो' फोटो पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 04:09 PM2020-01-14T16:09:59+5:302020-01-14T16:14:50+5:30
शिवसेना भवनवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर लावण्यात आला असून खालील बाजुस शिवाजी महाजारांची मूर्ती बसविण्यात आली आहे. हा महाराजांचा एकप्रकारे अपमान असल्याचा रोख उदयनराजेंचा होता.
मुंबई - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपनेते उदयनराजे भोसले यांनी राज्यातील राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेकडून महाराजांच्या मूर्तीला शिवसेना भवनवर दिलेल्या स्थानावरून प्रश्न उपस्थित केले.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'' असं शिर्षक असलेले पुस्तक जयभगवान गोयल यांनी लिहिले आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या कार्यालयात केले. त्यामुळे भाजपवर चहुबाजूने टीका होत आहे. हाच धागा पकडून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवासी झालेल्या शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुस्तकावरून गप्प का ? असा सवाल केला होता.
यानंतर खासदार संभाजी राजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यानंतर छत्रपती उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. या पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी शिवसेना भवनचा शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला व्यक्ती राष्ट्रवादीच्या नेत्याला मुजरा करतानाचा फोटो दाखवला.
दरम्यान शिवसेना भवनवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर लावण्यात आला असून खालील बाजुस शिवाजी महाजारांची मूर्ती बसविण्यात आली आहे. हा महाराजांचा एकप्रकारे अपमान असल्याचा रोख उदयनराजेंचा होता. याचा राग मराठा संघटनांमध्ये देखील आहे. आता उदयनराजे यांनीच ही बाब समोर आणल्यामुळे शिवसेना भवनवरील बाळासाहेबांची प्रतिमा आणि शिवाजी महाजारांची मूर्ती चर्चेत आली आहे. शिवसेना आता यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.