पनवेलच्या तरुणाने टिपलेले छायाचित्र लंडनमधील प्रदर्शनात
By admin | Published: June 29, 2017 03:01 AM2017-06-29T03:01:41+5:302017-06-29T03:01:41+5:30
पनवेल येथे राहणारा सुश्रुत सुनील करपे याने २०१६मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा एक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल येथे राहणारा सुश्रुत सुनील करपे याने २०१६मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा एक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नामांकन मिळाले असून, लंडनमधील प्रदर्शनात हे चित्र लावण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या आषाढवारीला जाताना सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असतो. दिवेघाट ते सासवड या भागातही छायाचित्रे टिपण्यासाठी अनेक फोटोग्राफर या ठिकाणी उपस्थित असतात. करपे याने गतवर्षीच्या पालखी सोहळ्या वेळी सासवडजवळील वाघ डोंगर येथून पालखी तळकडे हाती पताका घेऊन चाललेल्या वारकऱ्यांचे एक छायाचित्र घेतले होते. हे छायाचित्र एक कंपनीने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान निवडण्यात आले. त्यानंतर ते लंडन येथील सॉमरसेट हॉलमध्ये प्रदर्शनासाठी लावण्यात आले.
संस्कृतीचे दर्शन या संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धेतील तरुण छायाचित्रकरांच्या गटात सुश्रुतला हे मानांकन मिळाले आहे. या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारीतील वारकऱ्याच्या छायाचित्राकरिता उल्लेखनीय छायाचित्रकाराचा बहुमान सुश्रुतला मिळाला असून, पनवेल परिसरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.