बीड हिंसाचाराच्या आरोपीचे फोटो एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंसोबत; राष्ट्रवादीच्या नेत्याने पोस्ट केले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:58 PM2023-11-27T15:58:52+5:302023-11-27T16:00:10+5:30
ऋषिकेश बेदरे बरोबरचे फोटो ट्विट करून शरद पवार यांचे नाव खराब करण्याचे काम विरोधक करत आहेत. आता भाजपाने बोलावे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जाळपोळ, हिंसाचार, ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचे फोटो नेत्यांसोबत असल्याचे दाखवून एकमेकांना बदनाम करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग माफियाचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. भाजप खासदारावर दगडफेक करणाऱ्या आरोपीचे फोटो शरद पवारांसोबत पोस्ट करण्यात आले होते. आता राष्ट्रवादीने बीड जाळपोळ आणि हिंसाचारातील आरोपीचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
बीड जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणातील आरोपी पप्पु शिंदे यांचे फोटो पाहून आता भाजपा नेत्यांनी सांगावे की, बीडच्या हिंसाचारात कुणाचा हात आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे का खासदार श्रीकांत शिंदे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे. ऋषिकेश बेदरे बरोबरचे फोटो ट्विट करून शरद पवार यांचे नाव खराब करण्याचे काम विरोधक करत आहेत. बेदरे हा मराठा आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ता आहे. बेदरे याच्याविरोधात स्थानिक भाजपा आमदार आहेत. मग बीड जिल्ह्यातील जाळपोळीचा मुख्य सूत्रधार असलेला पप्पू शिंदे याचे फोटो कोणासोबत आहेत, असा सवाल शेख यांनी केला आहे.
पप्पू शिंदे हा शिवसेनेच्या शिंदे गटाचे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांचा भाचा आहे. त्याचे फोटो एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आहेत. मग आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
सरकार अंतरावाली दगडफेकीतील गुन्हे मागे घेणार बोलतेय आणि नंतर दोन महिन्यांनी ऋषिकेश बेदरेला अटक करते. बीडच्या जाळपोळीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत का? असे नितेश राणे आणि राम कदम यांनी ट्विट करावे. भुजबळांनी हा प्रश्न कॅबिनेटच्या बैठकीत उपस्थित करावा आणि सरकारला हा प्रश्न विचारावा, अशी मागणी शेख यांनी केली आहे.