संमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे
By admin | Published: March 11, 2016 04:11 AM2016-03-11T04:11:29+5:302016-03-11T04:11:29+5:30
साथीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची पुरेशी समज सुशिक्षित स्त्रीला असते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिलेले खटले बलात्काराच्या व्याख्येत बसत नाहीत
मुंबई : साथीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची पुरेशी समज सुशिक्षित स्त्रीला असते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिलेले खटले बलात्काराच्या व्याख्येत बसत नाहीत, असे स्पष्ट करत, उच्च न्यायालयाने एका २५ वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सोलापूरच्या २५ वर्षीय तरुणाने तो एका मुंबईतील २४ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. मात्र, दोघांमधील नाते संपुष्टात आल्यानंतर संबंधित मुलीने मुलाविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदवला. पोलिसांनी त्याच्यावर बलात्कार, फसवणूक केल्याबद्दल गुन्हा नोंदवला. मार्च २०१५ मध्ये दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. मे २०१५ मध्ये जेव्हा मुलीची गर्भधारणा झाल्याचे मुलाला कळले, तेव्हा त्याने मुलीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलाने तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले, असे मुलीच्या वकिलांनी न्या. मृदुला भाटकर यांना सांगितले. ‘ज्या अर्थी महिलेने संबंध ठेवण्यास होकार दिला, म्हणजेच तिची ‘संमती’ होती,’ असे म्हणत न्या. भाटकर यांनी मुलाची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्याच्या जामिनावर सुटका केली, तसेच यापुढे मुलीशी संपर्क साधण्याचा किंवा तिला व तिच्या कुटुंबीयांची छळवणूक न करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)