भगवानगडावर धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक
By admin | Published: January 6, 2015 02:49 AM2015-01-06T02:49:07+5:302015-01-06T02:49:07+5:30
भगवानगडावर दर्शनासाठी आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर सोमवारी सकाळी दगडफेक करण्यात आली.
दर्शन न घेताच माघारी परतले : घटनेमागे भाजपा कार्यकर्ते असल्याचा आरोप, श्रद्धेला राजकीय रंग
पाथर्डी (जि. अहमदनगर) : भगवानगडावर दर्शनासाठी आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर सोमवारी सकाळी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे त्यांना दर्शन न घेताच माघारी जावे लागले. या घटनेमागे भाजपा कार्यकर्ते असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. या घटनेमुळे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय वाद चांगलाच पेटला आहे.
३० डिसेंबरपासून भगवानगडावर भगवान बाबांच्या समाधी सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाची सांगता मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे गडावर दर्शनासाठी आले होते़ धनंजय मुंडे आल्याचे पाहताच काहींनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली़ गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या निवासस्थानी मुंडे थांबले होते़ तोपर्यंत बाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यामुळे मुंडे समाधीचे दर्शन न घेताच मंदिराच्या मागच्या बाजूने गाडी काढून निघाले. काही जणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली़ सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही़ पोलीस प्रशासनाला मुंडे येणार असल्याचे माहिती होते;
तरीही पोलिसांनी गडावर अपेक्षित
बंदोबस्त ठेवला नाही. बंदोबस्त असता तर असा प्रकार घडला नसता, असे भाविकांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
भगवान बाबांवर माझी निर्मळ श्रद्धा आहे. हे राजकारण करण्याचे स्थान नाही. बाबांच्या समाधीचा सुवर्ण महोत्सव असल्याने दर्शनासाठी जात असताना माझ्या ताफ्यावर झालेली दगडफेक दुर्दैवी आहे. भाजपाच्या विघ्नसंतोषी लोकांनी हा प्रकार केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.