मुंबईकरांचा पिकनिक मूड
By admin | Published: October 23, 2014 04:07 AM2014-10-23T04:07:27+5:302014-10-23T04:07:27+5:30
शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गोव्यासह परदेशातील ठिकाणांना सर्वाधिक पसंती देण्यात आली असून रेल्वेसह विमानसेवा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मात्र दिवाळीतील सुट्यांचे व्यवस्थित नियोजन न केल्याने काहींना रेल्वे आणि विमानांच्या वाढलेल्या भाड्याचा मोठा फटकाही बसला आहे.
सरकारी तसेच खासगी कार्यालयांना २३ ते २६ आॅक्टोबरपर्यंत दिवाळीची सु्टी मिळाली आहे. त्यामुळे या सुट्यांचे नियोजन करत मुंबईकरांनी दिवाळी मुंबईबाहेर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईबाहेर जाणाऱ्यांची एकच गर्दी पाहता रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. तर विमान कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष आॅफर दिल्या आहेत. यंदा मुंबईकरांनी पिकनिकसाठी परदेशातील ठिकाणेही निवडली असून थायलंड, हाँगकाँग आणि सिंगापूरला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नसल्याने आणि चार दिवसांत या टूर होत असल्याने या ठिकाणी जाण्यास अनेक उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे भारतातील केरळ, राजस्थान, उटी यांना तर राज्यातील अलिबाग, पुणे तसेच गोवा या ठिकाणीही जाण्यास मुंबईकर पसंती देत आहेत. (प्रतिनिधी)