पिकनिक पॉइंट - गडचिरोली
By admin | Published: July 6, 2016 08:39 AM2016-07-06T08:39:06+5:302016-07-06T10:34:34+5:30
पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर ४६ वर्षापूर्वी लाकडापासून उभारलेल्या विश्रामगृहाची ख्याती अजूनही विदर्भात कायम आहे.
ऑनलाइन लोकमत
पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर ४६ वर्षापूर्वी लाकडापासून उभारलेल्या विश्रामगृहाची ख्याती अजूनही विदर्भात कायम आहे.
१९६४ साली एका वनाधिकाऱ्याने पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर हे विश्रामगृह उभारले. विश्रामगृह उभारण्यासाठी पूर्णपणे सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला. भिंत, फरशी आदींसह विश्रामगृहाचा संपूर्ण भाग लाकडानेच उभारला आहे. विश्रामगृहाच्या बांधकामासाठी सिमेंट, चुना आदी साहित्याचा वापर अजिबात करण्यात आला नाही. विश्रामगृह नैसर्गिकरित्या वातानुकूलित आहे. ४६ वर्षानंतरही विश्रामगृहाची इमारत देखणीच आहे. येथे भेट देणारा पर्यटक विश्रामगृहात चार घटका थांबून परत जाताना या अनोख्या विश्रामगृहाला कॅमेऱ्यात कैद करून नेतो. पर्यटकांसाठी आकर्षण व भामरागडसारख्या आदिवासी दुर्गम भागात कलेचा उत्कृष्ट नमुना देखरेखीअभावी नष्ट होतो की काय, अशी भिती वाटत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आकर्षक ठरणारे हे विश्रामगृह आजही अनेक अधिकारी, मंत्री व राजदरबारी वजन असणाऱ्यांना पुन्हा -पुन्हा येथे या म्हणून खुणावतो. भामरागड येथे वनविभागाच्या या विश्रामगृहाशिवाय पर्लकोटाच्या तीरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचेही विश्रामगृह पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व विद्यमान पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी २००६ मध्ये या विश्रामगृहात बैठक घेऊन पर्लकोटाच्या पुराने बाधित झालेल्या भामरागडवासीयांना दिलासा दिला होता. भामरागड गावाला पुराचा वेढा पडला की पर्लकोटाच्या तीरावरील विश्रामगृहही पाण्याने भरून जायचे, हा नित्यक्रम आजही कायमच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात पुरांच्या खानाखुणा तयार झाल्या आहेत. व तशी नोंद भिंतीवर घेण्यात आली आहे. भामरागड येथे इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम या तीन नद्यांचा संगमही आहे. या ठिकाणी पर्यटकांना विलोभनिय आनंद पावसाळ्याच्या दिवसात घेता येऊ शकतो. लाकडाच्या रेस्टहाऊसमध्ये राहण्याचा आनंदही विलक्षणच आहे. भामरागडपासून पुढे बिनागुंडा, लोकबिरादरी प्रकल्प यांनाही भेटी देता येऊ शकते. तसेच या भागात विविध जातीचे वृक्ष जंगलामध्ये असून अभ्यासकांसाठी ही पर्वणीचे ठरणार आहे. तसेच हेमलकसा येथे आमटेज अॅनिमल फॉर्मवर विविध प्रकारचे प्राणी बघावयास मिळतात. या भागात दिवसभर करता येईल एवढे पर्यटन निश्चितच होण्यासारखे आहे. भामरागडला जेवण्याचीही सुविधा उपलब्ध होऊ शकते. पावसाळ्यापूर्वी व उन्हाळा संपतानाचा काळ या भागात फिरण्यासाठी अनुकूल काळ आहे.
कुठे आहे?- भामरागड गावात नदीच्या काठावर वनविभागाचे विश्रामगृह आहे.
कसे जाणार?- गडचिरोली व चंद्रपूरवरून एसटीबसने भामरागडला जावे लागते.
मुक्कामाची व्यवस्था - भामरागड येथे बांधकाम विभाग व वनखात्याचे विश्रामगृह आहे.
भामरागड (हेमलकसा)
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तालुका असलेल्या भामरागड (हेमलकसा) हे पावसाळी पर्यटनासाठी अतिशय चांगले स्थळ आहे. संपूर्ण जंगलातून भ्रमंती करत या स्थळाकडे जाणे शक्य होऊ शकते. येथे जाण्यासाठी रेल्वेने आल्यास चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या बल्लारपूर रेल्वेस्थानकावर उतरावे. तेथून टॅक्सीद्वारे वा खासगी वाहन भाडे तत्त्वावर घेऊन येथे येता येऊ शकते. याशिवाय बल्लारपूर, चंद्रपूर येथून अहेरीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध आहेत. साधारणत: १३० किमी हे अंतर पडते. अहेरी (आलापल्ली)वरून पुन्हा नवीन बसगाडी पकडून ६५ किमी अंतरावर हेमलकसा भामरागड येथे पोहोचता येते. चंद्रपूरवरून साडेतीन तासाचा प्रवास आहे.
भामरागड येथे निवास व्यवस्था
येथे निवासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच वन विभागाचे विश्रामगृह आहे. याशिवाय डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक बिरादरीतही राहण्याची सुविधा आहे. मात्र त्यांना पूर्वसूचना देऊन आल्यास ही सुविधा शक्य आहे. येथे खानावळीमध्ये भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.
काय पाहण्यासारखे आहे
या ठिकाणी इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम, हे भामरागड येथे पाहता येतात. तेथून ३० किमी अंतरावर बिनागुंडा हे पर्यटनस्थळ आहे. याशिवाय हेमलकसा येथील आमटेज अॅनिलम फार्मस् पाहण्यासारखे आहे. वाटेतच ग्लोरी आॅफ फॉरेस्ट हे वन विभागाचे महाकाय वृक्ष पाहण्याची सुविधा आहे. प्रचंड पावसातही या भागात फिरण्यासाठी पोषक वातावरण आहे. वन विभागाचे विश्रामगृह हे संपूर्ण सागवान लाकडापासून तयार केलेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह हे पर्लकोटा नदीच्या अगदी काठावर वसलेले आहे.
बरोबर आणावयाचे सामान
दैनंदिन गरजेच्या वस्तू, कपडे याशिवाय पाऊस असल्याने छत्री किंवा रेनकोट, गमबूट, सोबत टार्च आदी वस्तू आणाव्यात.
आणखी वाचा
(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)
(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)
(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)
(पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया))
(पिकनिक पॉईंट : सौताडा-कपिलधार (बीड))