पिकनिक पॉईंट - नाशिक

By Admin | Published: July 5, 2016 08:48 AM2016-07-05T08:48:34+5:302016-07-05T08:56:34+5:30

नाशिक जिल्ह्यातील कळवण जवळील हतगड परिसरात भिवतास धबधबा गुजरात व महाराष्ट्राच्या पर्यटकांचे आकर्षण आहे.

Picnic Point - Nashik | पिकनिक पॉईंट - नाशिक

पिकनिक पॉईंट - नाशिक

googlenewsNext

 संजय पाठक

नाशिक, दि. ४ - 

‘हतगड’ जवळचा भिवतास धबधबा

असे आहे पर्यटन स्थळ-
नाशिक जिल्ह्यातील कळवण जवळील हतगड परिसरात भिवतास धबधबा गुजरात व महाराष्ट्राच्या पर्यटकांचे आकर्षण आहे. नाशिकहून हतगड ओझरखेड धरण ओलांडल्यानंतर कळवण तालुक्याच्या हद्दीतील हे निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात भिवतास धबधबा ओसंडून वाहतो. गर्द हिरवाईतून वाहणारा हा धबधबा बघून पर्यटक सुखावतात. जवळच हतगड, सापुतारा हे अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील प्रेक्षणीय निसर्गरम्य ठिकाणं आहेत. नाशिक-गुजरात सीमेवर सातमाळा रांगेचा प्रारंभ हतगडपासून होतो. नाशिक-सापुतारा घाट मार्गावरचा हतगड हा पर्यटकांसाठी स्वल्पविराम आहे. मुघलांच्या वर्चस्वाखाली असलेल्या हतगड किल्ल्याची रचना पाहून मुघलकालीन शैलीचे वर्चस्व जाणवते. या किल्ल्याच्या पायथ्याशी हतगडवाडी गाव आहे. मराठी, हिंदी, आदिवासी या बोलीभाषा आहेत.

कसे पोहोचाल- मुंबईहून नाशिकला पोहोचल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुजरात-सापुतारा बसेस नाशिकहून उपलब्ध आहेत. सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून, तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या बसेसही नाशिकहून उपलब्ध आहेत. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपनेदेखील जाता येऊ शकते.

किती वेळ लागतो? -  सुमारे पावणे दोन तास
बरोबर काय न्यायला हवं? - पिण्याचे पाणी, सतरंजी
निवास व्यवस्था
या भागात शुद्ध शाकाहारी भोजन उपलब्ध आहे. तसेच निवास व्यवस्थेसाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत.

त्र्यंबकेश्वरचा दुगारवाडी धबधबा

असे आहे पर्यटनस्थळ -

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा दुगारवाडी धबधबा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच असलेली पेगलवाडी, पहिने ही गावे पावसाळ्यात बघण्यासारखी असतात. या भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे, गर्द हिरवाईने नटलेला परिसर आणि हिरवाईने पांघरलेला शालू व अधूनमधून सातत्याने संततधार कोसळणारा पाऊस असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना मोहिनी घालते. जणू नाशिक जिल्ह्यातील हे कोकणच! नाशिक शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर भाविक, पर्यटकांच्या पसंतीचा आहे. दुगारवाडी धबधबा हा गर्द हिरवाईतून कोसळणारा अत्यंत उंच असा धबधबा आहे. मात्र हा भाग धोकादायक असून, पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

कसे पोहोचाल?
नाशिकमध्ये बसस्थानकावर पोहोचल्यानंतर तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वरसाठी मेळा बसस्थानकापासनू दर पाऊण ते तासाने बस उपलब्ध आहे. त्यासाठी ३२ रुपये भाडे आकारले जाते, तसेच खासगी वाहतुकीची वाहनेही उपलब्ध आहेत. स्पेशल वाहन केल्यास शंभर ते दीडशे रुपये घेतात. त्र्यंंबकेश्वरहून अवघ्या सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सापगाव आहे. जव्हारकडे जाणाऱ्या बसगाड्यादेखील सापगावला थांबतात. तेथून धबधब्यासाठी पायी जावे लागते. डोंगर दऱ्यातून वाट काढत जाताना नदीही ओलांडावी लागते.

किती वेळ?
नाशिक ते त्र्यंबक अथवा सापगावपर्यंत एक ते सव्वा तास. सापगावपासून थेट दुगारवाडी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अडीच तास लागतात.

बरोबर काय न्यायला हवं? -  सापगावपासून धबधब्यापर्यंत खाद्यपदार्थांची कोणतीही सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली आवश्यक, दऱ्या खोऱ्यातील भाग असल्याने आधारासाठी काठी नेल्यास उत्तम.

निवास व्यवस्था- त्र्यंबकेश्वर येथे हॉटेल्स तसेच काही संस्थांचे भक्तनिवास उपलब्ध होतात.




नाशिकचा दूधसागर धबधबा


असे आहे पर्यटनस्थळ- नाशिक शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाजवळ गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा बघण्यासाठी नाशिककर मोठी गर्दी करतात. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी दक्षिणगंगा अर्थात गोदावरी नदीचे रूप बघण्यासारखे असते. या नदीवरील सोमेश्वर धबधबा हे नाशिककरांचे पसंतीचे ठिकाण आहे. याच धबधब्याला दूधसागर धबधबाही म्हणतात. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे खडकावरून कोसळणारे पाणी व रुंदी अधिक असल्यामुळे नयनमनोहर दृश्य बघावयास मिळते. जास्त रुंदीचा धबधबा म्हणून तो परिचित आहे. पोहोण्यासारखे साहस करणे मात्र येथे धोक्याचे आहे. फोटोसेशनसाठी हे अत्यंत उत्तम डेस्टिनेशन आहे. जवळच न्यासाचे बालाजी मंदिर व सोमेश्वर मंदिर आहेत.


कसे पोहोचाल? - नाशिक शहरात आल्यानंतर अशोकस्तंभ बस थांब्यावरून गंगापूर गावाकडे जाणाऱ्या बस उपलब्ध आहेत. याशिवाय आॅटोनेही जाता येते. शेअर रिक्षा जेमतेम पंधरा रुपये आकारतात. स्पेशल आॅटो रिक्षाही जातात. त्यासाठी जादा दर आकारले जातात. सोमेश्वर धबधबा हे स्थान सांगावे लागते. मुख्य गंगापूर रस्त्यापासून आतमध्ये पायी गेल्यास वीस मिनिटे चालत जावे लागते. खासगी वाहन थेट धबधब्याजवळ जाते.


किती वेळ लागतो? - नाशिक शहरातून जाण्यासाठी जेमतेम अर्धा तास.


बरोबर काय न्यायला हवं? -  खाद्यपदार्थ, बसण्यासाठी सतरंजी


निवास व्यवस्था-  नाशिक शहरातच असल्याने निवास व्यवस्था या भागात नाही. भाजलेला मका केवळ उपलब्ध आहे.

 


 

  आणखी वाचा :

(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)

(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)

(पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट)

(पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया))

(नागपूरमधील पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट : सौताडा-कपिलधार (बीड))

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

Web Title: Picnic Point - Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.