पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’

By Admin | Published: June 29, 2016 11:02 AM2016-06-29T11:02:55+5:302016-06-29T11:10:16+5:30

औरंगाबादपासून अवघ्या ३६ किलोमीटरवर असलेले म्हैसमाळ म्हणजे मराठवाड्याचे ‘महाबळेश्वरच’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हैसमाळ म्हणजे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ...

Picnic points: Mhasamal .. Mahabaleshwar of Marathwada | पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’

पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’

googlenewsNext
औरंगाबादपासून अवघ्या ३६ किलोमीटरवर असलेले म्हैसमाळ म्हणजे मराठवाड्याचे ‘महाबळेश्वरच’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हैसमाळ म्हणजे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ... वनस्पतिशास्त्राची येथे जणू प्रयोगशाळाच वसलेली आहे. तुम्हाला येथे विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांचे प्रकार पहायाला मिळतील. पावसाळा अन् हिवाळ्यात तर जणू स्वर्गच धर्तीवर उतरल्याचा अनुभव येतो. मान्सूनमध्ये तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवा गालिचा अन् पायाशी लोळणारे ढग हे डोळ्याचे पारणे फेडतात...
म्हैसमाळ सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग आहे. या परिसराला सुंदर, विलक्षण पर्वतरांग लाभलेली आहे. मराठवाड्यातील हे मिनी महाबळेश्वर एका उंच पठारावर चहूकडे सर्वदूर पसरलेले आहे. या पठाराच्या मधून जाणारी डांबरी सडक पठार विभागून उत्तरेकडच्या टोकापर्यंत जाते. पावसाळ्यात अधून- मधून सतत कोसळणाऱ्या मुसळधार, रिमझिम पावसाच्या सरी, हिरव्यागार खोल दऱ्या, प्रसन्न करणारी हवा, मनमोहक व्ह्यू- पॉर्इंट, घनदाट झाडी, जागोजागी चढ- उतारांच्या पाऊलवाटा... त्यातच मधोमध असलेला गिरजा तलाव, हे चित्र डोळ्याचे पारणे फेडते. येथील व्ह्यू- पॉर्इंटस्वरून जवळजवळ ३० किलोमीटर इतका दिसणारा आसमंत एखाद्या चित्रासारखा भासतो. दऱ्या- खोऱ्यातील रेखीव शेती, मध्ये असलेली छोटी घरे, जागोजागी दिसणारे जंगलांचे पुंजके आपल्या मनात घर करून जातात. पावसाळ्यात तर जणू स्वर्गच धरतीवर उतरला आहे की काय, अशी अनुभुती येथे मिळते. 
येथील समशीतोष्ण हवामान आपल्याला हवेहवेचे वाटते. आकडेवारीनुसार येथील तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, तर किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे वर्षभरात कधीही यावे, असे हे पर्यटनस्थळ आहे. 
वनविभागाने पूर्वीपासूनच वनपर्यटनाचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन येथे सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे म्हैसमाळच्या आजूबाजूला अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणी उदयास आली आहे, जी पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत. येथील दूरदर्शनच्या मनोऱ्याजवळून दिसणारा अप्रतिम देखावा अजिबात चूकवू नये, असाच आहे. छोटछोटे तलाव, जंगल, दऱ्यांनी नटलेले हे विस्तीर्ण पठार एकदा तरी नक्कीच भेट देण्यासारखे आहे. 
 
धार्मिक स्थळही
म्हैसमाळ हे शिवाच्या एका जुन्या मंदिराच्या अवशेषाचेही ठिकाण आहे. त्यामुळे भागाचे मुळ नाव महेशमाळ होते. अपभ्रंश होऊन कालांतराने महेशमाळचे म्हैसमाळ नाव पडले. या परिसराच्या मधोमध गिरजा देवीचे मंदीर आहे. हे मंदीर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच पठारावर आता एक बालाजी मंदीरही वसविण्यात आले आहे. हे मंदीरही पाहण्यासारखेच आहे. म्हैसमाळपासून अवघ्या बारा किलोमीटरवर असलेले खुलताबादेत देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारोतीचे विशाल मंदीर आहे. याच खुलताबादेत मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या महमंद पैगंबरांच्या मिशीचा केस ठेवलेला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांसाठीही हे एक पवित्रस्थान मानल्या जाते. शिवाय जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या, बारा जोर्तीलिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वरचे मंदीर आणि दौलताबादचा किल्लाही येथून अवघ्या १४ ते १५ किलोमीटर अंतरावरच आहे. 
 
येण्या- जाण्याची व्यवस्था
-औरंगाबादपर्यंत येण्यासाठी विमान, रेल्वे आणि बसची व्यवस्था आहे.
- औरंगाबादेतून म्हैसमाळचे अंतर सुमारे ३६ किलोमीटर आहे. त्यासाठी औरंगाबादेतून आधी खुलताबाद यावे लागते. तेथून १२ किलोमीटर अंतरावर म्हैसमाळ आहे. येथे जाण्यासाठी बस, खासगी टॅक्सी उपलब्ध आहेत. 
- वाहनाने हे अंतर जास्तीत जास्त एक तासाचे आहे. 
 
 
जवळची पर्यटन, धार्मिकस्थळे
- येथून वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदीर १४ किलोमीटर आहे.
- प्रसिद्ध खुलताबादेतील भद्रा मारोती मंदीर १२ किलोमीटरवर आहे.
- औरंगाबाद- म्हैसमाळ मार्गावरच दौलताबाद किल्ला आहे. तोही या प्रवासात पाहता येतो.
 
 
निवासाची व्यवस्था
- म्हैसमाळला आता वनविभागाच्या वतीने जंगलातच एसी तंबू उभारण्यात आले आहेत. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. लवकरच राहण्यासाठी हे तंबू उपलब्द होतील.
- म्हैसमाळच्या पठारावर निवासासाठी हॉटेल आहेत.
- किंवा एक दिवसाचे पर्यटन करून खुलताबाद, औरंगाबादला मुक्कामाला येता येते. 
 
 
 
आणखी वाचा : 
 
(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)
(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)
  •  
 

 

Web Title: Picnic points: Mhasamal .. Mahabaleshwar of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.