नागपूरमधील पिकनिक पॉईंट्स
By Admin | Published: July 2, 2016 01:25 PM2016-07-02T13:25:40+5:302016-07-02T13:26:20+5:30
सावनेर तालुक्यातील खापा परिसरात असलेले खेकरानाला हे स्थळ नागपूर शहरापासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. ते खापाजवळील छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर आहे
>नागपूर, दि. २ -
खेकरानाला तलाव
सावनेर तालुक्यातील खापा परिसरात असलेले खेकरानाला हे स्थळ नागपूर शहरापासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. ते खापाजवळील छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर आहे. खेकरानाल्याचा संपूर्ण परिसर वनराई आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. साहसी कृत्य करण्याची आवड असणाऱ्यांसाठी अर्थात पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण चांगले असल्याचे मानले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरानाला धरणाच्या सभोवताल असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. या ठिकाणी जाण्यासाठी नागपूरहून कि मान एक ते दीड तास लागतो. येथे स्वत:च्या वाहनाने जावे लागते. शिवाय, आवश्यक ते खाद्यपदार्थ - पिण्याचे पाणी सोबत न्यावे लागते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे ‘लॉंजिंग’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे अंमली पदार्थ व शस्त्र नेण्यास मनाई आहे.
खिंडसी
रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूर ते खिंडसी हे अंतर ५६ कि.मी. असून, रामटेक ते खिंडसी सहा कि.मी. आहे. येथे रामटेकहून जावे लागते. नागपूर बसस्थानकाहून रामटेकसाठी एसटी बसेस व रेल्वे सोय आहे. येथे खासगी वाहनांनी जाता येते. रामटेकहून खिंडसीला जाण्यासाठी बसेसची सोय नाही. वैदर्भीय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. साहसी उपक्रम करणाऱ्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व खासगी रिसोर्ट आहेत. या ठिकाणी जेवण व नाश्त्याची देखील सोय आहे. या ठिकाणी येथे अंमली पदार्थ व शस्त्र नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
अंबाखोरी
अंबाखोरी हा पिकनिक स्पॉट नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून वाहणाऱ्या पेंच नदीच्या तीरावर तसेच तोतलाडोह जलाशयाच्या परिसरात आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. हे स्थळ नागपूर शहरापासून ९० कि.मी तर, नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७ वरील वनपवनीपासून २३ कि.मी अंतरावर आहे. येथे बस किंवा रेल्वे जात नसल्याने स्वत:च्या वाहनाने जावे लागते. या ठिकाणी असलेला धबधबा आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या परिसरातील शाकुंतल व मेघदूत जलाशयाचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी मुक्कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असून, जेवणाची सोय नाही. त्यामुळे पर्यटकांना खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी सोबत न्यावे लागते. येथे मादक व अंमली पदार्थ तसेच शस्त्र नेण्यास मनाई आहे.