देशातील विजेचे चित्र तीन वर्षांत पालटले

By admin | Published: June 11, 2017 05:02 AM2017-06-11T05:02:29+5:302017-06-11T05:02:29+5:30

दिशाहीन आणि नियोजनशून्य कारभारामुळे देशात एकेकाळी विजेचा आणि कोळशाचा मोठा तुटवडा होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात अवघ्या तीन वर्षांत विजेबाबतचे चित्र

The picture of electricity in the country has changed in three years | देशातील विजेचे चित्र तीन वर्षांत पालटले

देशातील विजेचे चित्र तीन वर्षांत पालटले

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिशाहीन आणि नियोजनशून्य कारभारामुळे देशात एकेकाळी विजेचा आणि कोळशाचा मोठा तुटवडा होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात अवघ्या तीन वर्षांत विजेबाबतचे चित्र पालटले आहे. आज आपल्याकडे अतिरिक्त वीज व कोळसा आहे. शिवाय, भारताच्या विजेवर नेपाळ, भूतानसारखे आपले शेजारी देश प्रकाशमान होत आहेत. नियोजनबद्ध व पारदर्शक कारभारातून देशाची विजेची गरज भरून काढताना सामान्य शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांना किफायतशीर दरात वीज पुरविण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल यांनी शनिवारी केले.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित ‘लोकमत ऊर्जा समिट-२०१७’च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी पीयूष गोयल यांच्यासह देशाचे माजी ऊर्जा सचिव अनिल राजदान, रिलायन्स एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देबाशीष बॅनर्जी, ‘रवीन ग्रुप’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय करिया, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, ‘महाजनको’चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा उपस्थित होते.
सरकार व जनतेमध्ये संवाद व्हावा यासाठी लोकमतने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आजची ऊर्जा समिट त्याचाच एक भाग असल्याचे सांगून पीयूष गोयल म्हणाले की, वीज केंद्रांची दिशाहीन उभारणी आणि नियोजनशून्य कारभारामुळे देशातील सात कोटी कुटुंबे विजेपासून वंचित होते. या कुटुंबांना आपण वीज देऊ शकतो, याचा साधा व्यवहारिक विचारही आधीच्या सरकारांनी केला नव्हता. स्वातंत्र्यापासून आजतागायत वीज पोहचलीच नाही, अशी देशांत १८,५०० गावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट २०१५ साली एक हजार दिवसांत देशातील प्रत्येक गावात वीज पोहचविण्याची घोषणा केली होती. पंतप्रधानांच्या घोषणेप्रमाणे या गावांमध्ये वीज पोहचवली जात आहे. आता सहाशे दिवस झाले असून केवळ ३८०० गावातील वीज जोडणी बाकी आहे. या वर्षाअखेरीस या सर्व गावांत वीज पोहचलेली असेल. २०२२पर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर छप्पर आणि घरात पाणी आणि वीज देण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात आज अतिरिक्त वीज असली तरी पर्यावरणाच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्रोत तसेच एलईडी दिव्यांच्या वापरातून जास्तीत जास्त विजेची बचत करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे पीयूष गोयल यावेळी म्हणाले. २०१९पर्यंत देशात शतप्रतिशत एलईडी दिवे लागतील. सर्वांनी शंभर टक्के एलईडी दिव्यांचा वापर केला तर देशभरातील ग्राहकांचेच एकूण ४० हजार कोटी रुपये वाचतील त्याचबरोबर एकूण ११२ अब्ज युनिट वीजही वाचेल, असे गोयल यांनी सांगितले. पर्यावरणाचा विचार करता, सर्वत्र एलईडीचे उद्दिष्ट गाठल्यास दरवर्षी ८० दशलक्ष टन कार्बन डायआॅक्साईडचे उत्सर्जन टाळता येणार आहे.
आजमितीला देशभरात २४ कोटी ०४ लाख ९५ हजार २९५ एलईडी दिव्यांची विक्री झाली आहे. मोदी सरकारच्या आधी वर्षाकाठी केवळ सहा लाख एलईडी दिवे विकले जायचे. शिवाय, एलईडी दिव्यांचे दर कमी करण्यातही आम्ही यशस्वी झालो. पूर्वी शंभर रुपयाच्या अनुदानानंतरही सात वॅटचा दिवा सहाशे रुपयांना मिळायचा.
सरकारची खरेदी किंमतच ३१० रुपये होती. आता मात्र नऊ वॅटचा दिवा अवघ्या ३८ रुपयांमध्ये आम्ही उपलब्ध करून दिला आहे. दर्जाच्या बाबतीत कोणतीच तडजोड न करता तब्बल ८८ टक्के दरकपात आम्ही करून दाखविली असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
कोळशाच्या तुटवड्याच्या बातम्या आता इतिहास जमा झाल्या आहेत, दररोज कोळसा नसल्यामुळे वीजनिर्मिती कशी झाली नाही, याची आकडेवारी एकेकाळी प्रसिद्ध व्हायची. हे चित्र आता बदलले आहे. अतिरिक्त पुरवठ्यामुळे कोळशाचे उत्पादन पाच टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय
आता घ्यावा लागत आहे. तीन वर्षांत देशातील नकारात्मक मानसिकता सकारात्मक करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. जनतेचा विश्वास आणि अधिकाऱ्यांचे काम यांचे मोठे योगदान याकामी लाभल्याचे गोयल म्हणाले.
ऊर्जेतूनच सर्वांचे भविष्य घडणार आहे. पीयूष गोयल यांनी देशाच्या ऊर्जा धोरणाला दिशा दिली, आपल्या पारदर्शक कारभाराने गोयल यांनी महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याचे प्रतिपादन लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. ‘उजाला’ हा उपक्रम भारताच्या ऊर्जा इतिहासातील सर्वांत मोठा आणि प्रभावी उपक्रम आहे. त्याबद्दल गोयल यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आगामी काळात परवडेल अशा दरात शेतकरी, उद्योगांना वीज मिळावी. सौरऊर्जेवर चालणारे अत्याधुनिक पाण्याचे पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने एखादी योजना आणावी, अशी मागणीही दर्डा यांनी यावेळी केली.
तर, धोरणकर्ते आणि वाचकांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी लोकमतने कायमच अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ऊर्जा क्षेत्रातील विविध पैलूंवर चर्चा घडावी आणि उपस्थित मान्यवरांच्या मंथनातून ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा मिळावी, यासाठी ऊर्जा समिटचे आयोजन करण्यात आल्याचे लोकमतचे ऋषी दर्डा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले.

पाकिस्तानला वीज नाहीच
उद्घाटनपर भाषणानंतर विजय दर्डा यांनी शेतकरी, स्वस्त दरातील वीज आणि ग्रामीण भागात भूमिगत वीजतारांचे जाळे निर्माण करण्याबाबत गोयल यांना प्रश्न विचारले. सामान्य जनतेच्या अपेक्षा प्रतिबिंबित करणाऱ्या या प्रश्नांसोबतच देशातील अतिरिक्त वीज पाकिस्तानला विकणार का, असा प्रश्न दर्डा यांनी विचारला. यावर, ‘अजिबात नाही’, असे स्पष्ट व रोखठोक उत्तर पीयूष गोयल यांनी दिले. दहशतवाद आणि सीमेवरील उचापती थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानबाबत आमचे धोरण कठोरच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘भीम अ‍ॅप’ जग गाजवेल
केंद्र सरकारने सादर केलेली ‘भीम अ‍ॅप’ ही सेवा जगभर आपला विस्तार करेल, असा विश्वासही पीयूष गोयल यांनी विजय दर्डा यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. ‘भीम अ‍ॅप’मध्ये वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञामुळे व्हिसा, मास्टर आणि अमेरिकन एक्सप्रेस आदी डेबिट व क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही ‘भीम अ‍ॅप’ पर्याय ठरेल. केवळ अंगठ्यावर जगभरात ‘भीम अ‍ॅप’ चालेल, असे गोयल यांनी सांगितले.

सौरपंपाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय
शेतकऱ्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्यांना स्वस्त
दरात अत्याधुनिक सौर कृषीपंप उपलब्ध देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पीयूष गोयल म्हणाले.

 

Web Title: The picture of electricity in the country has changed in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.