चित्रांनी सजली येरवडा कारागृहाची संरक्षक भिंत

By admin | Published: April 3, 2017 01:02 AM2017-04-03T01:02:25+5:302017-04-03T01:02:25+5:30

तुरुंगाची भिंत म्हणजे रुक्ष, कोरडी ठणठणीत, कठोर, भावहीन दिसणारी

Pictures of Yerawada prison wall decorated with pictures | चित्रांनी सजली येरवडा कारागृहाची संरक्षक भिंत

चित्रांनी सजली येरवडा कारागृहाची संरक्षक भिंत

Next


पुणे : तुरुंगाची भिंत म्हणजे रुक्ष, कोरडी ठणठणीत, कठोर, भावहीन दिसणारी. आतील बाजूने ती अशी असेल कदाचित; पण तिचे बाह्यरूप मात्र काही चित्रकारांनी आता असे आकर्षक केले आहे की, ही भिंत न बोलताही जाणाऱ्या-येणाऱ्यांशी रंगसंवाद करू लागली आहे. त्यांना आनंद देऊ लागली आहे.
सुमारे ३०० मीटर लांबीची व तब्बल ७ मीटर उंचीची म्हणजे, २२ हजार ६०० चौरस फूट अशी प्रचंड लांबी-रुंदी असलेली ही भिंत म्हणजे अन्य सर्व भिंतींसारखीच खडबडीत अशी होती. कारागृहाची भिंत असल्यामुळे तिच्या खडबडीतपणात वाढच झाली होती. रस्त्याने वाहनावरून किंवा पायीही जाताना ती संपता संपत नसे. या रस्त्याने विमानतळावरून येणारे-जाणारे अनेकजण प्रवास करीत असतात. पुण्यात प्रवेश करताक्षणीच त्यांचे स्वागत या कोरड्या, रुक्ष भिंतीने
होत असे.
ही बाब जाणवल्यामुळेच रंगकामांसाठी म्हणून खास या भिंतीची निवड करण्यात आली. हर्षवर्धन कदम या चित्रकाराने अवघ्या काही महिन्यांमध्येच आपल्या अन्य काही युवा चित्रकारांच्या साह्याने या भिंतीचे स्वरूप बदलले आहे. त्यावर आकर्षक रंगांची उधळण करण्यात आली आहे. एकचएक चित्र न काढता कधी उसळत्या लाटा, तर कधी रस्त्याने सायकल चालवत जाणारी एखादी ललना, कुठे खेळणारी लहान मुले अशी सर्वसमावेशक चित्रे या भिंतीवर चितारण्यात आली आहे. त्यामुळे आता या रुक्ष भिंतींचे स्वरूपच बदलून गेले आहे.
गेल्या काही महिन्यात कंपन्यांच्या मागे आर्थिक वर्ष अखेरीमुळे ताळेबंद तयार करण्याचे काम लागले होते. त्यामुळे अचानक या उपक्रमाचे अर्थसाह्य बंद झाले. महापालिका आयुक्त हे अर्थसाह्य पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. हेरिटेज विभागाने तर शहरातील अशा भिंतींची यादीच तयार केली असून, त्यावर कोणती चित्रे काढायची याचेही नियोजन केले आहे.
(प्रतिनिधी)
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कल्पनेतून शहरात हा ‘स्पिकिंग वॉल’ उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत ही भिंत रंगवण्यात आली. शहरातील बालभारती; तसेच अन्य काही संस्थांच्या भिंतीही अशाच आकर्षक रंगात रंगविण्यात आल्या आहेत.
बिनाले फाउंडेशन ही संस्था या उपक्रमात समन्वयाचे काम करीत आहे, तर सीएसआरच्या
(कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून काही कंपन्यांनी खर्चाची जबाबदारी उचलली आहे. महापालिकेच्या हेरिटेज सेलचे प्रमुख अभियंता श्याम ढवळे या उपक्रमाचे संयोजन करत आहेत.

Web Title: Pictures of Yerawada prison wall decorated with pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.