तारांकित प्रश्नाला फुटले पाय! भाजपा आमदाराचा प्रताप, पटलावर येण्यापूर्वीच माहिती बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:22 AM2018-03-23T00:22:46+5:302018-03-23T00:22:46+5:30
काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी पाठविलेले तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर येण्यापूर्वीच एका भाजपा आमदाराने त्या प्रश्नाचा संदर्भ देत परस्पर चौकशीचे निर्देश दिल्याने प्रशासन पार चक्रावून गेले आहे.
- गणेश देशमुख
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी पाठविलेले तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर येण्यापूर्वीच एका भाजपा आमदाराने त्या प्रश्नाचा संदर्भ देत परस्पर चौकशीचे निर्देश दिल्याने प्रशासन पार चक्रावून गेले आहे.
मुंबईच्या काळाचौकी येथील माझगाव मजूर सहकारी संस्थेने बनावट बिलाच्या आधारे शासनाची १५ लक्ष रुपयांनी फसवणूक केल्यासंदर्भात विजय वडेट्टीवार, अमर काळे, हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, संतोष टारफे, सुनिल केदार, डी.पी.सावंत या काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी विधिमंडळ सचिवालयाकडे तारांकित प्रश्न पाठवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो अद्याप पटलावर आलेला नाही.
तुमसरचे भाजपा आमदार चरणदास वाघमारे यांनी सदर तारांकित प्रश्नाचा संदर्भ देत गृह खात्याच्या उपसचिवांना १ मार्च २०१८ रोजी सहा मुद्यांवर चौकशीचे निर्देश दिले. आणखी एका प्रश्नाबाबतही असेच घडले. सार्वजनिक बांधकाम विभागात बदलीच्या नावावर दलालांनी केलेल्या फसवणुकीबाबत सदर आठ आमदारांनी तारांकित प्रश्न पाठविला आहे. या प्रश्नाचा संदर्भ देत आ. वाघमारे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपसचिवांना १ मार्च रोजी पत्र पाठवले आहे.
सभागृहात येण्यापूर्वीच तारांकित प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाचे आमदाराने चौकशीचे परस्पर निर्देश कसे दिले? तारांकित प्रश्नाची माहिती त्यांना कोणी दिली? दुसऱ्या सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाचा संदर्भ देऊन एखाद्या आमदाराला असे चौकशीचे पत्र देता येते का? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात.
- उपस्थित करावयाचे तारांकित प्रश्न संबंधित आमदारांकडून विधानमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे पाठविले जातात. विधानमंडळ प्रशासन संबंधित खात्याकडून त्यासंबंधिची माहिती मागवते. हा सर्व दस्तऐवज सभागृहाच्या पटलावर येईपर्यंत तो सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात गोपनीयतेचा भंग झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
तारांकित प्रश्न स्वीकारला गेल्यानंतर प्रशासकीय व्यवस्थेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मी संबंधित खात्यांना पत्र दिले आहे. माझे पत्र कुणाला पाठीशी घालण्यासाठी नसून सखोल चौकशीसाठी आहे. त्यात गैर काय? इतरांच्या तारांकित प्रश्नांबाबतची माहिती मिळू नये, असा नियम नाही.
- चरणदास वाघमारे,
आमदार, तुमसर विधानसभा