रुग्णाच्या खाटेवर आढळली अजगराची पिले
By admin | Published: June 10, 2016 09:17 PM2016-06-10T21:17:00+5:302016-06-10T21:17:48+5:30
कामगार रुग्णांच्या उपचाराला घेऊन नेहमीच चर्चेच राहणाारे विमा रुग्णालय शुक्रवारी वेगळ्याच घटनेने चर्चेत आले. या रुग्णालयात चक्क रुग्णांच्या खाटेवर अजगराची पिले आढळून आली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १० - कामगार रुग्णांच्या उपचाराला घेऊन नेहमीच चर्चेच राहणाारे विमा रुग्णालय शुक्रवारी वेगळ्याच घटनेने चर्चेत आले. या रुग्णालयात चक्क रुग्णांच्या खाटेवर अजगराची पिले आढळून आली. ही पिले पकडल्याजाईपर्यंत रुग्णांसह डॉक्टर, कर्मचारी व परिचारिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, या घटनेला घेऊन येथील रुग्ण किती सुरक्षित आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. या विभागात खाटेवर रुग्णांऐवजी दीड ते दोन फुटाची दोन अजगराची पिले वळवळताना एका परिचारिकेच्या नजरेस पडली. तिने लागलीच आरडाओरड केली. डॉक्टरांसह, कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली. रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एका कर्मचाऱ्याने सर्पमित्राला फोन करून बोलवून घेतले. सर्पमित्राने अत्यंत शिताफीने अजगराच्या दोन्ही पिल्लांना पकडून डबाबंद केले. सुदैवाने खाटांवर रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
यापूर्वी रुग्णालय परिसरात विषारी साप निघाल्याची माहिती आहे. रुग्णालय परिसरात साप निघणे हे नेहमीचे झाले असले तरी अधिकारी लक्ष देत नसल्याचे येथील कर्मचारी सांगतात. विशेष म्हणजे, रात्रपाळीतील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक रात्रीला तळमजल्यावर झोपतात. यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पकडलेली दोन पिले ही सापाची नसून, अजगराची असल्याचे सर्पमित्राने सांगितले.
रुग्ण धोक्यात...
रुग्णालय परिसर झाडा-झुडपांनी वेढला आहे. कचऱ्याचा ढीगही साचलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरक्षा भिंतीचे बांधकाम थंडबस्त्यात पडले होते ते आता सुरू झाले आहे. रुग्णालयाची दारे व खिडक्या जुनाट असून खिळखिळ्या झाल्या आहेत. मांजरीपासून कुत्र्याची पिले सहज रुग्णालयात प्रवेश करतात. आता अजगराची पिलेही येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. याला घेऊन रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
खडकीच्या फटींमधून आले असावे...
रुग्णालयाच्या परिसरात झाडेझुडूपे आहेत. याच परिसरात संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. यामुळे अजगराची पिले खिडकीच्या फटींमधून आली असावी. रुग्णांच्या सुरक्षेला घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
डॉ. मीना देशमुख
वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय