आयपीएलविरुद्ध जनहित याचिका
By admin | Published: April 6, 2016 05:10 AM2016-04-06T05:10:25+5:302016-04-06T05:10:25+5:30
राज्यात दुष्काळ असतानाही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेपूर्वी मैदानावरील खेळपट्टीची देखभाल करण्याकरिता लाखो लीटर पाणी वापरण्यात येईल, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आली आहे.
मुंबई : राज्यात दुष्काळ असतानाही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेपूर्वी मैदानावरील खेळपट्टीची देखभाल करण्याकरिता लाखो लीटर पाणी वापरण्यात येईल, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.
आयपीएलचे सामने खेळविण्यात येणाऱ्या मुंबई, नागपूर आणि पुणे येथील मैदानांवरील खेळपट्यांच्या देखभालीसाठी ६० लाख लीटर पाणी वापरण्यात येईल. एकीकडे पाण्याअभावी मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, अशी मागणी ‘लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे.
या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. महाराष्ट्र जल धोरणामध्ये पाणीवाटसाठी प्राधान्य ठरवून दिले आहे. अशा कामाकरिता पाणी वापरण्यासाठी सगळ्यात शेवटी महत्त्व देण्यात आले आहे. त्यावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सामन्यांची तिकिटे आधीच विकल्याचे खंडपीठाला सांगितले. या याचिकेवरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करताना उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, राज्य सरकार आणि मुंबई, नागपूर महापालिकेला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, केतन तिरोडकर यांनीही उच्च न्यायालयात आयपीएलमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीवापराविरुद्ध जनहित याचिका दाखल केली
आहे. (प्रतिनिधी)