परदेशी शिक्षणासाठी नीट विरोधात जनहित याचिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 03:32 AM2018-03-11T03:32:01+5:302018-03-11T03:32:01+5:30
परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना नीट प्रवेश परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या व घेऊ इच्छिणा-या अनेक विद्यार्थ्यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
पुणे - परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना नीट प्रवेश परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या व घेऊ इच्छिणा-या अनेक विद्यार्थ्यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित यचिका पुण्यातील करिअर मार्गदर्शक डॉ. तुषार देवरस मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत.
नव्याने परदेशी शिक्षण घ्यायला जाणा-या विद्यार्थ्यांनाच केवळ नीट परीक्षा सक्तीची करावी आणि एकदा विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाला की त्याचा निकाल आंतरराष्ट्रीय प्रवेशासाठी तीन वर्षे वैध मानला जावा, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. अमेरिका, फिलिपिन्ससारखा बीएसचा कोर्स जे विद्यार्थी करत आहेत ते आधीपासूनच देशाबाहेर असल्याने त्यांना नीट परीक्षा सक्तीतून वगळावे.
अमेरिका, फिलिपिन्स, कॅरेबियन बेट आणि जिथे अमेरिकेच्या धर्तीवर शिक्षण दिले जाते अशा देशांमध्ये बीएस व एमडी हा अभ्यासक्रम शिकायला जाणाºया विद्यार्थ्यांना बीएसच्या शिक्षणासाठी भारताततून जातानाच भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) ने सशर्त पात्रता प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून त्यांना नंतर एमडीला प्रवेश घेणे सोयीचे होऊ शकेल अशी मागणी देवरस यांनी केली आहे.