तीर्थयात्रा लवकरच होणार सुपरफास्ट !
By admin | Published: March 27, 2016 03:27 AM2016-03-27T03:27:06+5:302016-03-27T03:27:06+5:30
रस्त्यांच्या विकासासाठी मिळालेल्या तब्बल २७ हजार कोटींच्या पॅकेजमधून सोलापूर शहरासह जिल्ह्याचाही चेहरामोहरा बदलणार आहे. सोलापुरात दोन उड्डाणपूल होणार असून, अनेक वर्षांपासून
- शिवाजी सुरवसे, सोलापूर
रस्त्यांच्या विकासासाठी मिळालेल्या तब्बल २७ हजार कोटींच्या पॅकेजमधून सोलापूर शहरासह जिल्ह्याचाही चेहरामोहरा बदलणार आहे. सोलापुरात दोन उड्डाणपूल होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालखी मार्गाचेही चौपदीकरण या पॅकेजमधून होणार आहे. पंढरपूरसह तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रांशी सोलापूरची असलेली कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन रस्त्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या या रस्ते पॅकेज कामाचा कोनशिला समारंभ केंद्रीय वाहतूक
व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
शनिवारी येथे पार पडला़ या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते़
जुना पुणे नाका ते विजापूर रोडवरील सोरेगावपर्यंत आणि हैदराबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते विजापूर रोडवरील पत्रकार भवनापर्यंत अशा दोन प्रमुख मार्गांवर सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून दोन उड्डाण पूल बांधले जाणार आहेत़ सोलापूर-विजापूर तसेच सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर, सोलापूर ते कोल्हापूर, पंढरपूर ते देहू आणि पंढरपूर ते आळंदी हे पालखी मार्ग, तुळजापूर ते अक्कलकोट या नवीन महामार्गांची घोषणा गडकरी यांनी भाषणात केली़
सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे १११० कोटींचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून सोलापूर ते येडशी (उस्मानाबाद) या १०० किलोमीटरचे ९७२ कोटींचे काम वेगाने सुरू आहे़ सोलापूर ते संगारेड्डी (हैदराबाद) या १०० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम (९२३ कोटींचे) गतीने सुरू आहे़ याशिवाय सोलापूर ते विजापूर (११४७ कोटी), सोलापूर ते अक्कलकोट-गाणगापूर (१००० कोटी) आणि सोलापूर ते सांगली-कोल्हापूर (२२५० कोटी) , टेंभुर्णी शहरातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम (१०७ कोटी) देण्यात आले आहे. ही सर्व कामे येत्या तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर सोलापूरहून
पुणे, उस्मानाबाद, हैदराबाद, विजापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी ये-जा करणे सहज आणि सुपरफास्ट होणार आहे़
असे आहेत २७ हजार कोटींचे महामार्ग
- भूमिपूजन झालेल्या सहा कामांची (४६३ किमी) किंमत ५,७५४ कोटी
- सध्या सुरू असलेल्या कामांची (४११ किमी) किंमत ३,८९८ कोटी
- जिल्ह्यातील नऊ राष्ट्रीय महामार्गांना तत्त्वत: मंजुरी (१५५९ किमी)़ किंमत १७ हजार कोटी
- केंद्राच्या निधीतून (सीआरएफ) महामार्गांची कामे करणे ११३ कोटी
- महामार्गांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीसाठी ४१ कोटी