औद्योगिक विकासाच्या चर्चेत ‘चिमट्यांचे’ उद्योग
By admin | Published: September 1, 2015 01:50 AM2015-09-01T01:50:31+5:302015-09-01T01:50:31+5:30
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरच्या (डीएमआयसी) निमित्ताने येथे झालेल्या औद्योगिक विकासाच्या चर्चेत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढण्याचे उद्योग केले.
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरच्या (डीएमआयसी) निमित्ताने येथे झालेल्या औद्योगिक विकासाच्या चर्चेत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढण्याचे उद्योग केले.
उद्योजक, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना युतीच्या नेत्यांनी आश्वासनाचे कोंदण लावले. शेंद्रा व बिडकीनमध्ये होणाऱ्या डीएमआयसी प्रकल्पाचे सोमवारी सादरीकरण व चर्चा झाली. खा. चंद्रकांत खैरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे विभागासाठी काही मागण्या केल्या.
हाच धागा पकडून विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले,
खा. खैरे व उद्योगमंत्र्यांची भेट लवकर होत नाही. त्यामुळे खैरेंनी त्यांच्या मागण्या येथे सांगितल्या. माझी
व देसार्इंची दररोज भेट होते.
त्यामुळे मी येथे मागण्या न मांडता काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. बागडे यांच्या या कोटीने सभागृहात खसखस पिकली .
बागडे यांच्यानंतर उद्योगमंत्री देसाई यांनी उद्योजक, व्यावसायिकांनी विचारलेल्या प्रश्नांना नंतर पाहून सांगतो, नियोजनात विचार करू, तुमच्या प्रश्नांचा विसर पडणार नाही, अशी उत्तरे दिली. तर बागडे यांच्याकडे पाहत मराठवाड्यात आमचा मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. उद्योगात महाराष्ट्राची स्पर्धा शेजारी राज्यांशी नाहीच, तर इतर देशांसोबत आहे.
जनरल मोटर्ससारख्या बड्या उद्योगाने गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतर करण्याची घोषणा केली आहे, यातच सर्व आल्याची कोपरखळी मारली. (प्रतिनिधी)