पिंपरीमध्ये दहावीच्या मुलाने मुलावरच केला लैंगिक अत्याचार, दापोडीतला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 01:32 PM2017-09-28T13:32:47+5:302017-09-28T14:05:00+5:30
दहावीतील 16 वर्षीय मुलानेच 11 वर्षीय मुलावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दापोडी येथे उघडकीस आली आहे.
पिंपरी : दापोडी येथील अनाथ आश्रमात दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याने ११ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असताना,या प्रकरणी आश्रमाच्या संचालकांनी पोलिसांकडे धाव घेतली नाही. या बद्दल पोलिसांकडून संचालकाची कसून चौकशी सुरू आहे.
दापोडीतील झोपडपट्टी परिसरात सरस्वती आश्रम आहे. लक्ष्मण देवीदास सुरवसे हे आश्रमाचे संचालक आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील झोपडपट्टीतील मुले या आश्रमात ठेवण्यात आली आहेत. गरिब,गरजू कुटूंबातील ५० मुले या आश्रमात आहेत, एका ११ वर्षाच्या मुलावर दहावीतील मुलाने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पिडीत मुलाने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला दिली. आईने पोलिसांत जाऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपी मुलाच्या नातेवाईकांनी पिडीत मुलाच्या आईला तक्रार देण्यापासून रोखले. तक्रार देऊ नये, म्हणुन त्यांना ८ हजार रूपये दिले. तसेच संस्थेकडून कोणी पोलिसांकडे जाऊ नये,यासाठी संस्थाचालक सुरवसे यांना पाच हजार रूपये दिले. अशी चर्चा आहे. तक्रार देण्यास अडचणी येऊ लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलावर अत्याचार झाले, मात्र त्याची तक्रार दाखल होत नसल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले. आश्रमास भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पिडित आणि अत्याचार करणारा मुलगाही अल्पवयीन आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया भोसरी पालिसांनी सुरू केली.