पिंपरी: तरूणीच्या बेकायदा गर्भपातास नकार देणाऱ्या डॉक्टरवर हल्ला करणारे अटकेत, सांगवी पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 12:42 PM2017-09-11T12:42:42+5:302017-09-11T12:43:38+5:30
डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी, दि. 11-पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला होता. डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सागवी पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली आहे. शनिवारी रात्री काही अज्ञातांनी डॉक्टरवर कोयत्याने वार केले होते.
पिंपळे गुरव येथे काटे पुरम चौकात डॉ. अमोल बिडकर यांचे रुग्णालय आहे. एका युवतीला घेऊन एकजण काही दिवसांपूर्वी डॉ. बिडकर यांच्याकडे आला होता. युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आलं होतं. 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असेल तर कायद्याने गर्भपात करता येणार नाही. गर्भ 20 आठवड्यांचा असल्याने गर्भपात करू शकत नाही, असं डॉक्टरांनी सांगून डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. हे प्रेमीयुगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची माहिती आहे.
याचा राग आल्याने शनिवारी (9 सप्टेंबर) रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तिघेजण मोटारीतून बिडकर यांच्या दवाखान्याजवळ आले. एकजण दवाखान्याबाहेर थांबला. दुसरा डॉक्टरांच्या कॅबिनच्या दरवाजावर थांबला.तिसऱ्याने आत जाऊन डॉक्टरांवर कोयत्याने वार केले. डॉक्टरांच्या हातात मोबाईल होता. त्यांनी हात पुढे केला मोबाईलवर वार झेलल्याने मोबाईल फुटला.त्यांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली. खांद्यावर केलेला वार त्यांनी चुकवल्यामुळे ते बचावले.
या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य सांगवी पोलिस ठाण्यासमोर रविवारी सकाळी जमले होते. आरोपींवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती.