वधूच्या कौमार्य चाचणीवरून वाद, पिंपरीत विवाह समारंभात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:42 AM2018-01-23T03:42:04+5:302018-01-23T08:50:42+5:30
एका विवाह समारंभानंतर पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळ समाजातील तरुणांमध्ये वाद झाला. मुलींची विवाहापूर्वीची कौमार्य चाचणी, या समाजातील प्रथेच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
पिंपरी (पुणे) : कंजारभाट समाजातील एका विवाह समारंभानंतर पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळ समाजातील तरुणांमध्ये वाद झाला. मुलींची विवाहापूर्वीची कौमार्य चाचणी, या समाजातील प्रथेच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश अंकुश साइंदे्रकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सनी मलक, अमोल भाट, मोहन तामचीकर, विनायक मलके, रोहित रावळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. समाजातील मुलींची विवाहापूर्वी कौमार्य चाचणी करण्याच्या प्रथेविरोधात काही तरुणांनी पुढाकार घेऊन ‘स्टॉप दी व्ही व्हर्च्यूअल’ या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे.
प्रथेच्या विरोधात ग्रुपच्या माध्यमातून ते समाजातील तरुण-तरुणींमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजातील जात पंचायत पद्धतीविरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. काही दिवसांपासून जात पंचायत आणि कौमार्य चाचणी प्रथा त्यामुळे चर्चेत आली आहे. त्यावरून समाजातील दोन गटांत वाद होऊन हा प्रकार घटल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे भाटनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
केवळ चर्चेमुळे वादंग
पिंपरीत रविवारी कंजारभाट समाजातील एक विवाहसमारंभ झाला. त्या ठिकाणी कौमार्य चाचणी घेण्याबाबतचा असा कोणताही प्रकार घडला नाही. विवाह समारंभानिमित्ताने उपस्थित असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तसेच विविध ठिकाणांहून आलेल्यांमध्ये वाद झाला. समाजातील मुलींची कौमार्य चाचणी आणि जात पंचायत हेच चर्चेचे मुद्दे या वादाचे कारण ठरले. भारतीय दंड संहितेनुसार १४३, १४७, १४९, ३२३, ४२७ या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
- गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त