पिंडदानाच्या विधीत अतिक्रमण हटावची बाधा !
By admin | Published: June 17, 2015 03:49 AM2015-06-17T03:49:24+5:302015-06-17T03:49:24+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रामकुंडावर राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका पिंडदान
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रामकुंडावर राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका पिंडदान आणि अस्थिविसर्जनासाठी आलेल्या राज्यभरातील भाविकांनाही बसला. दशक्रिया विधीसाठी अमरावतीहून आलेल्या भाविकांनी तर पूजाविधीत बाधा आल्याने पोलिसांत तक्रार दिली.
दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीवरील रामकुंडावर अस्थिविसर्जन तसेच पिंडदान विधी करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. त्यांच्यासाठी पुरोहित संघाने रामकुंडावर पत्र्याच्या निवाराशेडची व्यवस्था केली आहे. तेथेच विधी पार पडले जातात. सोमवारी अतिक्रमण हटाव मोहिमेत निवाराशेडच पाडल्याने भाविकांची गैरसोय झाली.
(प्रतिनिधी)
प्रशासनाची दादागिरी
कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध घालण्यासाठी आम्ही नाशिकला रामकुंडावर पिंडदान विधी करण्यासाठी आलो होतो. विधी सुरू असताना अतिक्रमण विभागाने लोखंडी पाइप हटविण्याचे काम सुरू केले. एक पाइप पुजेच्या ठिकाणी पडला. धार्मिक विधी सुरू असताना केलेली कारवाई म्हणजे प्रशासनाची दादागिरीच आहे.
- अनिल काबरा, भाविक, अमरावती
विधी सुरू असताना कारवाई
पिंडदानासाठी अमरावतीहून आलेल्या अनिल काबरा यांच्या कुटुंबियांची पूजाविधी चालू असताना मोहीम राबविली गेल्याने त्यात व्यत्यय आला. विधीचे साहित्य विस्कटले गेले. तसेच लोखंडी पाइप पिंडदानावर पडल्याने भाविकांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काबरा यांनी स्थानिक पोलिसांना निवेदन देऊन महापालिकेच्या कृतीमुळे आपल्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी यावेळी पोलिसांकडे केली .