‘त्यांच्या’ जगण्याची वेदना समाजासमोर मांडण्याकरिता गुलाबी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 07:39 PM2018-12-06T19:39:30+5:302018-12-06T19:53:39+5:30
प्रस्थापित समाजापासून अद्याप कोसो मैल दूर अंतरावर असणा-या ‘‘त्या’’ समुहाला मुख्य प्रवाहात सामील करुन घेतले जात नाही.
पुणे : प्रस्थापित समाजापासून अद्याप कोसो मैल दूर अंतरावर असणा-या ‘‘त्या’’ समुहाला मुख्य प्रवाहात सामील करुन घेतले जात नाही. एकीकडे भेदाभेद अमंगळ या संतांच्या वचनाचे दाखले देवून समानतेची मांडणी करणारे ’’त्यांच्या’’ बाजुने लढाताना दिसत नाहीत. समानता, बंधुभाव, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक आदरभाव यासारख्या मुल्यांना कें द्रस्थानी ठेवून केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील एलजीबीटी समुहाचा ‘‘गुलाबी मेळावा’’ पुण्यात पार पडणार आहे. मेळाव्याच्या माध्यमातून त्या समुहातील व्यक्तींच्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
जागतिक एडस दिन सप्ताहाच्या निमित्ताने उडान या संस्थेच्या माध्यमातून येत्या शनिवारी (8) गुलाबी मेळावा कार्यक्रमातून समलैंगिक, तृतीयपंथी, व्यक्तींच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात येणार आहे. यंदा जनजागृतीपर कार्यक्रमाचे 26 वे वर्ष असून मुंबई, नवी मुंंबई, ठाणे, रायगड आणि पुणे या जिल्हयातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. एडस दिन सप्ताहाचे निमित्त साधत सध्या समाजातील समलैंगिक आणि तृतीयपंथीय यांच्या मुलभूत समस्यांवर त्या समुहातीलच मान्यवर व्यक्ती आपले विचार व्यक्त करणार आहेत. यात निलेश गोरे (चांदणी गोरे), महेंद्र बनसोडे (लावणी नृत्यांगणा) आणि विजय नायर उपस्थित एलजीबीटीच्या व्यक्तींना मार्गदर्शन करणार आहेत. स्वत:ची ओळख हा विषय घेवून त्यावर आतापर्यंतच्या प्रवासात आपल्याला आलेल्या अडचणीच्या प्रसंग, कटु अनुभव याबाबत ते संवाद साधतील. संवादाच्या माध्यमातून सद्यस्थितीत ‘‘त्यांच्या’’ समोरील प्रश्नांना योग्य दिशा मिळुन तो प्रश्न मार्गी लागावा हा उद्देश आयोजकांचा असल्याचे चंद्रकांत शिंदे सांगतात.
शनिवारी (८) नाना पेठेतील गंगा प्रेस्टीज आर्केड याठिकाणी होणा-या उत्सव सोहळयात विचारमंथना बरोबरच नृत्य, रांगोळी, मेहंदी या स्पर्धां पार पडणार असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. 1992 पासून सुरु झालेल्या उडान संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेलेल्या ‘‘त्यांना’’ आपलेसे करण्याचे काम केले जाते. स्वत:मधील वेगळेपणा, त्याची जाणीव करुन देत जे आहे ते स्वीकारण्याकरिताचे पाठबळ देण्यात महत्वाची भूमिका उडान बजावते.